पनवेल दि. ०६ (वार्ताहर)- स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीची युथ पनवेल शहर व तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची घोषणा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पनवेल येथे आयोजित बैठकीत केली व लवकरच नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व पनवेल महानगरपालिका निवडणुकीत सक्रीय सहभाग घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिली.
स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज भाई संसारे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा युथ अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल शासकीय विश्रामगृह येथे पक्षाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी पनवेल शहर व तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीच्या निमित्ताने आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकां संदर्भात चर्चा झाली. यावेळी पक्षाच्या नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे सचिव अशोक वाघमारे व जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे यांच्याशी चर्चा करून पनवेल शहर व तालुका संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात कोणीही नवीन कार्यकारिणी जाहीर होईपर्यंत पक्षाचा झेंडा, चिन्ह व पत्राचा गैरवापर करू नये असे आवाहन करण्यात आले. लवकरच जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे हे जिल्ह्याचा दौरा करून नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.