कुंडी नदी परिसरात अडकलेल्या पर्यटकांना तालुका पोलिस व ग्रामस्थांनी काढले सुखरूप बाहेर...

पनवेल दि. ३०(संजय कदम)ः तालुक्यातील वाजेपूर गाव परिसरातील सलमान खान यांच्या फार्म हाऊसजवळ असलेल्या कुंडी नदी वर्षा सहलीसाठी गेलेले काही पर्यटक अचानकपणे वाढलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अडकले होते त्यांना सुखरूप स्थानिक ग्रामस्थ व तालुका पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा आनंद लुटण्यासाठी काहीजण त्या भागात पर्यटनासाठी गेले होते परंतु अचानकपणे पाण्याचा लोंढा वाढल्याने ते अडकले गेले. यावेळी सलमान खान यांच्या अर्पिता फार्म हाऊस येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तातडीने नेरे पोलीस बीट येेथे कार्यरत असणारे एएसआय गोडसे यांना हि बाब कळवली. त्यांनी तात्काळ गावातील सामाजिक कार्यकर्ते नरेश पाटील यांना सांगून काही तरुणांना त्या ठिकाणी रस्सीसह पाठवण्यास सांगितले. ते सर्वजण त्या ठिकाणी पोहोचताच रस्सीच्या आधाराने त्या तरुणांनी अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढले. आपला जीव वाचवल्याबद्दल त्यांनी पनवेल तालुका पोलीसांसह नरेश पाटील व मदतीसाठी धाव घेणाऱ्या तरुणांचे आभार मानले आहेत.

Comments