पनवेल / वार्ताहर : - आज २५ सप्टेंबर हा जगभरात जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो.रुग्णांना योग्य औषधे देणे, त्यांचे समुपदेशन करणे या कामी हिरीरीने अग्रस्थानी असणारा समाजातील हा घटक महत्वाचा असला तरी बऱ्याचदा दुर्लक्षित राहिला आहे.फार्मासिस्ट मंडळींचे रुग्णसेवेचे कार्याचे प्रती आभार प्रकट करण्याचे उद्देशाने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने पनवेल मधील फार्मासिस्ट बांधवांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पनवेल नगरीच्या जडणघडण प्रक्रियेचे साक्षीदार असणाऱ्या यशवंत मेडिकल, माधव मेडिकल,धन्वंतरी मेडिकल आणि प्रिती मेडिकल यांना गौरविण्यात आले.पत्रकार मंचाचे अध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन फार्मासिस्ट बांधवांचा सत्कार केला.यशवंत मेडिकल चे यशवंत धारप हे गेली चार दशके अविरत रुग्णसेवा करत आहेत.४० वर्षांच्या प्रवासात औषध समुपदेशनाची अनेक स्थित्यंतरे पाहिलेल्या यशवंत धारप यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.पनवेलच्या पहिल्या पाच मेडिकल स्टोअर्स च्या सूचित सन्मानाने विराजमान होणारे अशोक गिल्डा यांचे माधव मेडिकल आजही त्याच निष्ठेने रुग्णसेवा बहाल करत आहे.लायन्स क्लब च्या माध्यमातुन देखील अशोक गिल्डा समाजसेवा देत आहेत.मंचाच्या वतीने माधव मेडिकल च्या गिल्डा यांचा सन्मान करण्यात आला.
फार्मासिस्ट बांधवांच्या अन्यारराष्ट्रीय स्तरावरील संस्थेचे सन्माननीय सदस्य असणाऱ्या संतोष घोडींदे यांचा देखील सन्मान करण्यात आला.औषध विक्री हा व्यवसाय नसून ती एक रुग्णसेवा असल्याच्या उदात्त हेतूने संतोष कार्य करत आहेत.त्यांनी धन्वंतरी मेडिकल मध्ये औषध माहिती केंद्र कार्यान्वित केले आहे.अनेक संस्थांतून कार्यरत असणारे संतोष घोडींदे हे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे सक्रिय सभासद देखील आहेत.
पनवेल येथील सर्वात व्यस्त असणारे मेडिकल स्टोअर म्हणजे प्रिती मेडिकल स्टोअर्स असे म्हटल्यास जराही अतिशयोक्ती होणार नाही.कितीही व्यस्त असले तरीही रुग्णांशी कायम हसतमुखाने आणि नम्र पणे संवाद साधणारे राजू पटेल यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.ते गेली ३२ वर्षे रुग्णसेवा देत आहेत.जुन्या पोस्टनजिक पटेल मेडिकल च्या माध्यमातून देखील यापूर्वी त्यांनी ९ वर्षे रुग्णसेवा दिलेली आहे.
कार्यक्रमाचे आयोजनाबाबत बोलताना अध्यक्ष माधव पाटील यांनी सांगितले की आजारातून बरे झाल्यावर डॉक्टरांचे आभार मानले जातात परंतु या प्रक्रियेत महत्वाचे असलेल्या फार्मसिस्ट बांधवांचे आभार मानले जात नाहीत.खरे तर प्रत्येक फार्मासिस्ट चा सत्कार करायचा आमचा मानस आहे.वेळेअभावी हे शक्य झाले नाही.आज पनवेलची ओळख म्हणून या मेडिकल स्टोअर्स ना गणले जाते.त्यांच्या रुग्णसेवेला सन्मानित करताना अत्यानंद होत आहे.
फार्मासिस्ट बांधवांच्या सन्मान सोहळ्याला अध्यक्ष माधव पाटील यांच्या समवेत सरचिटणीस मंदार दोंदे, विवेक पाटील, संजय कदम, खजिनदार नितीन कोळी, राजू गाडे,सचिन वायदंडे, सुनील राठोड, चेतन पोपेटा, वैभव लबडे आदी मान्यवर उपस्थित होते.