कोल्ही कोपर गावाची सिडकोकडून ससेहोलपट ; सिडकोने भूमीपुत्रांची केली घोर फसवणूक
वेळ पडल्यास सिडकोची सर्व कामे बंद पाडून रस्त्यावर उतरू ,पत्रकार परिषदेत कोल्ही-कोपर भूमीपुत्रांचा एल्गार
पनवेल: वार्ताहर
        नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोच्या आमिषाला बळी पडून आपली पिकती सुपीक जमीन व सुस्थितीत असलेली घरेदारे सिडकोला तुटपुंज्या दरात बहाल केल्यानंतर सिडकोने योजना दाखवून ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. साडे बावीस टक्के जमीन देण्याच्या नावाखाली प्रत्यक्ष साडे बारा टक्केच जमीन देऊन दहा टक्के मोबदला देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात साडे बारा टक्के जमीन मिळण्याऐवजी पावणे आठ टक्केच जमीन भूमीपुत्रांच्या वाट्याला आली असून सिडकोने भूमीपुत्रांची घोर फसवणूक केली आहे. या संदर्भात आज (बुधवार दि.२२) कोल्ही-कोपर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात भूमीपुत्रांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या झालेल्या फसवणुकीचा पाडा वाचला. या पत्रकार परिषदेला पंचकमिटीचे मोहन नाईक, धनराज भोईर, सरपंच अहिल्या बाळाराम नाईक, मनखुश नाईक, जनार्दन करावकर, बाळराम नाईक, महेंद्र नाईक, राहुल नाईक, तान्हाजी भोईर, हृषीकेश भोईर, गंगाराम नाईक, कृष्णा नाईक, प्रल्हाद नाईक, बबन घरत, राम पाटील, कृष्णा भोईर, अमृत भोईर, मधुकर भोईर, प्रभाकर नाईक, हरिभाऊ नाईक, काशिनाथ भोईर, रोहिदास पाटील, शंकर डोंगरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी येथील गाव कमिटीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिडकोच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. यासंदर्भात सिडको विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा एल्गारही यावेळी करण्यात आला. येथील प्रकल्पबाधित गाव कमिटीने सांगितले की, आमची घरे उठविल्यानंतर आम्हाला अठरा महिन्यांचे घरभाडे देण्याचे सिडकोने मान्य केले होते. मात्र प्रत्यक्षात बारा महिन्यांचे घरभाडे देण्यात आले असून आज साडेचार वर्षे उलटूनही अनेक प्रकल्पग्रस्त नागरिक भाड्याच्या घरातच राहत आहेत. यासंदर्भात सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा व पत्रव्यवहार करून सुद्धा सिडको आम्हा भूमीपुत्रांना वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उपस्थित भूमीपुत्रांनी सांगितले.
         सिडकोकडे गावासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली असता, त्या मागणीला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असून मैदानासाठी राखीव असलेला भूखंड एका शिक्षण संस्थेला देण्यात आलेला आहे. तसेच सिडकोने अनेक नागरी सोयी सुविधा देण्यासंदर्भात आम्हाला आश्वासने दिली होती, परंतु त्याची सुद्धा आजमितीस पूर्तता झाली नाही. आमचे कोल्ही-कोपर हे गाव नवी मुंबई विमानतळासाठी विस्थापित झाल्याने आम्हाला वडघर, करंजाडे, पुष्पकनगर नोड येथे जागा देण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या गावचे नावच नकाशावरून पुसले गेले आहे. त्यामुळे आमच्या गावाची ओळख कायम राहण्यासाठी या विभागाला गावाची मूळ नावे देण्यात यावीत. अशी आग्रही मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली.
         देवस्थानच्या भूखंडाच्या नावाखाली आमच्या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचा बराच हिस्सा सिडकोकडून लाटला गेला आहे. याबाबत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात अर्ज केला असता, या कार्यालयातून श्री.लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट मु.कोल्ही, तालुका-पनवेल, जि-रायगड या नावाने कोणतीही नोंद नसल्याचे लेखी पत्र आम्हाला देण्यात आलेले आहे. तरीही सिडकोच्या कागदोपत्री या ट्रस्टची नोंद करण्यात आली आहे. आमचे गाव यापूर्वी पारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत होते. मात्र आता गावाची अनेक ठिकाणी विभागणी झाल्यामुळे आमच्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अशीही मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. 
         सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, गावातील प्रमिला प्रभाकर नाईक व श्रीमती बेबी काशिनाथ भोईर यांची घरे सिडकोने तोडली असून त्यांना आजपर्यंत कोणतीही नुकसानभरपाई अगर मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे ही दोन्ही कुटुंब उध्वस्त झाली असून सध्या भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत. अशी माहिती उपस्थित ग्रामस्थांनी दिली.
यामुळे कोल्ही कोपर ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून या लढ्यात सिडकोने जर पोलीसबळाचा वापर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही दबणार नाही. त्याचबरोबर या विभागातील सिडकोची होणारी सर्व विकास कामेही बंद करण्याचा इशाराही यावेळी भूमीपुत्रांनी दिला.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image