इक्रा स्टिल ट्यूब प्रा.लि. कंपनीचा ३३ लाखांचा परतावा पनवेल शहर पोलिस व बँकेमुळे मिळाला परत


पनवेल दि.०२ (वार्ताहर): शहरातील इक्रा स्टिल क्यूब प्रा.लि. कंपनीची फसवणूक करून काही अज्ञात इसमांनी त्यांच्या खात्यातून जवळपास 33 लाख 29 हजार 479 रूपये स्वतःच्या खात्यात वळते केले होते. परंतु या संदर्भात सदर कंपनीचे मालक ईक्बाल काझी यांना माहिती मिळताच त्यांनी आपली फसवणूक होऊन खात्यातून चूकीचे पैसे दुसऱ्याने वळते केल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस व बॅंकेला दिली असता तांत्रिक तपासाच्या आधारे पनवेल शहर पोलिसांनी शोध घेऊन तसेच बॅंकेच्या सहकार्यामुळे त्यांच्या खात्यातून वळते झालेले दुसऱ्या खात्यातील पैसे पूर्णतः त्यांना परत मिळाले आहेत.
          सदर अज्ञात व्यक्तीने बॅंकेत फोन करून माझे चेकबूक संपले आहे. मला औषधासाठी पैसे हवेत त्यासाठी काही पैसे ट्रान्सफर करा असे बॅंकेच्या संबंधित व्यक्तींशी बोलून तसेच खोटे लटरहेडचा वापर करून त्याद्वारे पैसे पाठविण्याची विनंती करून त्याने त्याच्या अकाऊंटवर 22 लाख आरटीजीएस जमा झाले का तसेच इतर चौकशा करून वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या खात्यातून वेगवेगळ्या बॅंकेच्या खात्यात जवळपास 33, 29, 479 रू. फिरवून घेतले. या संबंधांचे मेसेज ईक्बाल काझी यांच्या मोबाईलला आल्यावर अशा प्रकारची कोणती रक्कम कंपनीच्या माध्यमातून त्यांनी काढली नसल्याने अज्ञात व्यक्तीने आपली फसवणूक करून आपल्या खात्यातून पैसे वळते करून घेतल्याचे समजले. यासंदर्भात त्यांनी तातडीने पनवेल शहर पोलिस तसेच बॅंकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन वळती झालेली रक्कम वेगवेगळ्या बॅंकेशी संबंध साधून थांबवून ठेवली. याबाबत अधिकृत तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात देताच सखोल चौकशी करण्यात आली. यात वेगवेगळ्या बॅंकेत गेलेले 14, 01, 401 रू. हे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले. त्याचप्रमाणे बॅंकेने अंतर्गत तांत्रिक तपास व चौकशीने तसेच वरिष्ठांशी चर्चा व मार्गदर्शन घेऊन त्यांच्या खात्यात 19, 28, 078 रू. जमा केल्याने चुकीच्या पद्धतीने गेलेले पूर्णतः पैसे पुन्हा खात्यात जमा झाल्याने ईक्बाल काझी यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे, पो.नि. (गुन्हे) संजय जोशी, पोलिस उपनिरीक्षक फरताडे त्याचप्रमाणे आयडिबीआय बॅंक पनवेल शाखेचे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे त्यांनी आभार मानले आहेत.
Comments