मोटारसायकल स्लिप होऊन चालकाचा मृत्यू ....
पनवेल दि.26 (वार्ताहर)- आदई सर्कल येथून नवीन पनवेल सेक्टर-6 च्या दिशेने जाणाऱया सागर विजय ठोंबरे (31) याची मोटारसायकल स्लिप झाल्याने तो फुटपाथवर असलेल्या इलेक्ट्रीक बॉक्सवर धडकुन मृत झाल्याची घटना आदई तलावाजवळ घडली.
या घटनेतील मृत सागर ठोंबरे हा नवीन पनवेल सेक्टर-6 मध्ये कुटुंबासह रहाण्यास होता. सागर आपल्या व्यवसायासाठी मोटारसायकलचा वापर करत होता. सागर आपल्या मोटारसायकलवरुन आदई सर्कल जवळून नवीन पनवेल सेक्टर- 6 येथील आपल्या घरी जात होता. त्याची मोटारसायकल आदई तलावाजवळ सेक्टर-9 भागात आली असताना, भरधाव वेगात असलेली त्याची मोटारसायकल स्लिप झाली. त्यामुळे सागर फुटपाथवर असलेल्या इलेक्ट्रीक बॉक्सवर जोरदार आदळला. यात सागरच्या डोक्याला दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. सागर ठोंबरे याने भरधाव वेगात निष्काळजीपणे मोटारसायकल चालविल्यामुळे त्याची मोटारसायकल स्लिप होऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळुन आले. त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी या अपघाताला सागर ठोंबरे याला जबाबदार धरुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.