काँग्रेस पक्षच तळागळातील लोकांना न्याय देवू शकतो या भावनेमुळेच अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; मा.मंत्री नसिम खान

पनवेल, दि.२९ (वार्ताहर) ः मोदी सरकारवरचा लोकांचा विश्‍वास आता उडत चालला असून काँग्रेस पक्षच हा तळागळातील लोकांना न्याय देवू शकतो ही भावना सर्वांमध्ये आता एकवटली आहे त्यामुळेच आज खारघरमध्ये सर्वधर्मीयांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांचे स्वागत करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कोकण प्रभारी, मा.मंत्री नसिम खान यांनी व्यक्त केले.
खारघर येथील अनेक जणांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत मा.मंत्री नसिम खान यांच्यासह रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर.सी.घरत, रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेसचे प्रदेशचे कमांडर कलावत, कार्याध्यक्ष सुदाम पाटील, बाबा कुलकर्णी, हिंदुराव कुलकर्णी, अमीर सय्यद, सुनील सावर्डेकर, ताहिर पटेल, आझाद भाई, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला आघाडीच्या निर्मला म्हात्रे, पनवेल शहराध्यक्ष लतिफ शेख, राकेश चव्हाण, माया अहिरे, शशिकला सिंह आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत रेमण्डजी, शिबू, वर्गीस यांच्यासह मोठ्या प्रमाणात विविध समाजातील बांधवांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेेळी बोलताना मा.मंत्री नसिम खान याांनी सांगितले की, खारघर हे बहुधर्मीय व बहुभाषिक शहर आहे. येथील समस्या या आमच्या समस्या असून या ठिकाणी महानगरपालिकेने लादलेला कर हा प्रश्‍न निकाली काढूच त्याचप्रमाणे भाजपची सत्ता यापुढे महानगरपालिकेवर येवू देणार नाही, यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे, आगामी निवडणूक ही स्वबळावर लढायची आहे. त्या दृष्टीने लोकांमध्ये जावून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सुद्धा सांगितले की, आता परिवर्तनाची लाट येवू लागली आहे. महागाईला सर्वच जनता त्रस्त झाली असून मोदी सरकारने फक्त आश्‍वासने दिली व त्या बदल्यात गोरगरीब जनतेला अजून गरीब केले आहे. काँग्रेसचा इतिहास आहे. ती सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असते. आगामी काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तर यावेळी बोलताना रायगड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर.सी.घरत यांनी सांगितले की, सत्तेत काँग्रेसला आणा व केंद्रातील चोरांना हटवा, यासाठी आम्ही सज्ज झालो असून आगामी निवडणूक ही जिंकायचीच या उद्देशाने कामाला लागायचे आहे. नसीम भाई हे नेहमीच पनवेलकरांच्या मदतीला येत असतात. यापुढे सुद्धा महाविकास आघाडीतर्फे जास्तीत जास्त निधी ते पनवेलसाठी आणून आपण सर्वांनी मिळून पनवेलमधील समस्या सोडवू व महानगरपालिकेवर त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवारांना विजयी करू, यासाठी आपण एकसंघ राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.


फोटो ः मा.मंत्री नसिम खान यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, आर.सी.घरत व इतर मान्यवर.
Comments