महापालिका क्षेत्रातील शिक्षकांसाठी विशेष लसीकरण सत्राला भरघोस प्रतिसाद ; ४७५ शिक्षकांचे झाले लसीकरण





पनवेल, दि.१६ : लवकरच शाळा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती आज (१७ ऑगस्ट) पनवेल महापालिका क्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षिकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर करण्यात आले होते. याला पनवेल कार्यक्षेत्रातून चांगला प्रतिसाद लाभला. आज दिवसभरात एकुण ४७५ शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले. 

पनवेल कार्यक्षेत्रात लसीकरणाला गती देण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. सध्या शाळा सुरू होण्याच्या पाश्वभूमीवर शालेय शिक्षकांचे लसीकरण होणे महत्वाचे असल्याने वैद्यकिय आरोग्य विभागचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गशर्नखाली लसीकरण टिम यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच पालिका हद्दीत येणाऱ्या ग्रामीण भागातही सहा लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून लसींच्या उपलब्धीनुसार दैनंदिन होणारे लसीकरण देखील वाढविले आहे. याबाबतीत रोज विक्रमी लसीकरण करण्यावर पालिका भर देत आहे. काल दि.16 ऑगस्टला आजवरचे सर्वात जास्त 5 हजार 202 लसीकरण झाले.
Comments