सततच्या बदलणार्‍या प्रशासनाच्या भूमिकेवर रेशन दुकानदारांची नाराजी, संघटना लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत...


पनवेल, दि. ४ (वार्ताहर) :-  शासकीय परिपत्रकानुसार धान्यापासून कोणीही गरीब वंचित राहू नये याबाबत सखोल माहिती दिलेली आहे. परंतु प्रशासनाकडून अलिखीत व आपल्या मर्जीनुसार सततच्या बदलणार्‍या भूमिकेनुसार अर्थ लावून प्रत्येकी वेळी बायामेट्रीक बाबत प्रश्‍न उपस्थित करून लाभार्थ्यांना मिळणारे धान्यांमध्ये अडचणी निर्माण करण्यात येत आहेत. त्यामुळे धान्य वाटपामध्ये दुकानदार व सर्वसामान्य रेशनकार्ड धारकांचा तोंडी संघर्ष होत आहे. यासाठीच रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशन पनवेल संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये प्रशासनाच्या सतत बदलणार्‍या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली व लवकरच सर्वपक्षीय बैठक घेवून मोठा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. 
जागतिक कोरोना महामारी, पावसाळा, पुरपरिस्थिती तसेच ई-पॉज मशिनवर बायोमेट्रीक पद्धतीने दुकानदारांना धान्य वितरणात येणार्‍या दैनंदिन अडचणी तसेच संभाव्य सणासुदीचे दिवस लक्षात घेता लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये यासाठी शासकीय वरिष्ठ अधिकार्‍यांनी शासनाच्या बायोमेट्रीक पद्धतीची व्यवस्थित माहिती उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे धान्य वितरण करताना दुकानदारांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी मंजुर नियतनाप्रमाणे यादीसह लेखी परिपत्रक माहे ऑगस्ट पासून उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी दुकानदारांची मागणी आहे. त्याचप्रमाणे शासनाने नेमलेल्या ठेकेदाराने द्वारपोच योजनेंतर्गत धान्य वाहतूक वाहनामध्ये वजन काटा उपलब्ध करून धान्याची गोणी वजन करून धान्य दुकानात पुर्ण वजनासह पोच करून देण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Comments