पनवेल दि. ०८ (वार्ताहर): वाशी सेक्टर-९ मधील डोळ्यांचे डॉक्टर असल्याचे भासवून एका भामट्याने एका ज्वेलर्स मालकाकडून १ लाख रुपयांची रोख रक्कम लुबाडुन पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. वाशी पोलिसांनी या भामट्या विरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणात फसवणुक झालेल्या ज्वेलर्स मालकाचे नाव बसंतीलाल ओस्तवाल (५५) असे असुन त्यांचे वाशी सेक्टर-९ मधील रत्नदीप बिल्डींग मध्ये नुतन ज्वेलर्स इंडिया प्रा.लि. नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. गत ५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एका भामटÎाने बसंतीलाल यांच्या फोनवर संपर्क साधला होता. त्यानंतर सदर भामट्याने त्यांच्या ज्वेलर्स दुकानाच्या बाजुला असलेल्या आय क्लिनिकमधील डॉ.निकम असल्याचे त्यांना सांगितले. तसेच त्याच्या आईसाठी दोन सोन्याच्या बांगड्या बनवायच्या आहेत असे सांगुन त्यासाठी एक लाख रुपये ऍडव्हान्स देत असल्याचे व पैसे घेण्यासाठी कर्मचाऱ्यांला क्लिनिकमध्ये पाठवण्यास सांगितले. यावेळी त्याच्याकडे २ लाख रुपये बंधे असल्याचे व त्यांनी कर्मचाऱयांकडे एक लाख रुपये सुट्टे पाठविल्यास त्याच्या कर्मचाऱ्याकडे तो २ लाख रुपये पाठवून देण्याचे भामट्याने सांगितले. बसंतीलाल यांच्या ज्वेलर्स दुकानाच्या बाजुला पहिल्या मजल्यावर डॉ.निकम यांचे आय क्लिनिक असल्याने बसंतीलाल यांनी आपला कर्मचारी भैरुसिंग राठोड याच्याकडे १ लाख रुपये देऊन डॉ.निकम यांच्या क्लिनिकमध्ये पाठवून दिले. त्यानुसार भैरुसिंग राठोड डॉ.निकम यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यानंतर त्याठिकाणी भेटलेल्या भामट्याने स्वत: डॉ.निकम असल्याचे भासवून भैरुसिंग याला दुसऱया मजल्यावर आपला फ्लॅट असल्याचे सांगून त्याठिकाणी त्याला नेले. त्यानंतर भामट्याने तेथील एका फ्लॅटचा बेल वाजविण्याचा बहाणा केला. त्यानंतर क्लिनिकमध्ये जाण्याची घाई असल्याचे व १ लाख रुपये एका पार्टीला द्यायचे आहेत, असे सांगून भामटÎाने भैरुसिंग राठोड याच्याकडे असलेली एक लाख रुपयांची रक्कम आपल्याकडे घेतली. तसेच फ्लॅटचा दरवाजा उघडल्यानंतर बांगड्या बनविण्यासाठी आईच्या हाताचे माप घेण्यास सांगुन त्याठिकाणावरुन पलायन केले. काही वेळानंतर सदर फ्लॅटमधील व्यक्तीने दरवाजा उघडल्यानंतर सदरचा फ्लॅट डॉ.निकम यांचा नसल्याचे भैरुसिंग राठोड याला समजले. त्यामुळे भैरुसिंग याने तत्काळ डॉ.निकम यांच्या क्लिनिमध्ये जाऊन भामट्याचा शोध घेतला असता, त्याच्या सोबत आलेला व्यक्ती हा डॉ.निकम नसून दुसराच व्यक्ती असल्याचे त्याला समजले. त्यानंतर भैरुसिंग याने बसंतीलाल यांना सांगितल्यानंतर त्यांनी सदर भामट्याबाबत अधिक माहिती काढली असता, तो डॉ.निकम यांच्या क्लिनिकमध्ये आपल्या आईचे डोळ्यांचे ऑपरेशन संदर्भात चौकशी करण्यासाठी आल्याचे त्यांना समजले. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बसंतीलाल यांनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
डॉक्टर असल्याचे भासवून ज्वेलर्स मालकाकडून १ लाख रुपये लुबाडणाऱ्या भामट्याचा पोलिसांकडून शोध सुरु ....