पनवेल तालुक्यातील घोटगावमध्ये पार पडला "लक्ष्मी" गाईच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम, गावाला घातले डोहाळे जेवण..


नवीन पनवेल : तुम्ही डोहाळे जेवणा विषयी अनेकदा ऐकलं आणि पाहिलंही असेल. पण पनवेल तालुक्यातील घोटगावातील डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. ही चर्चा आहे एका गायीच्या डोहाळे जेवणाची…  
पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या आपल्या गाईच्या डोहाळ जेवणाचा आनंद गाव जेवण देऊन साजरा केला. या अनोख्या कार्यक्रमातून जनावरां प्रती असलेले प्रेम जिव्हाळा दिसून आला आहे.

 पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती पशुपालन केले जात असे. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने शेतीशी निगडीत अशी संस्कृती या ठिकाणी होती. हिरवेगार भाताची शेत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढणार या डोंगरावरील गवत आणि तेथे गाई-म्हशी करण्यासाठी येत असत, ग्रामीण संस्कृती येथे दिसून यायची. परंतु सिडकोने नागरी वसाहती विकसित करण्यासाठी पिकत्या जमिनी संपादित केल्या आणि येथे वसाहती वसवण्यात आल्या. या कारणामुळे पशुपालन सुद्धा इतिहास जमा झाले. शेतकरी कुटुंब येथे राहत असले तरी शेती आणि जनावरे या भागातून हद्दपार झाले. येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असले तरी किंवा साडेबारा टक्के मुळे धनदौलत आली असली तरी शेती आणि पशुपालनाची ती श्रीमंती राहिलेली नाही. आजही अनेकांना पशुपालनाची आवड आहे. परंतू शेती आणि इतर अनेक अडचणीमुळे गाई-म्हशी पाळता येत नाही. असे असले तरी पनवेल तालुक्यातील घोट गाव येथील बाळा धुमाळ यांनी नितळस येथून चार वर्षापूर्वी लहानसे वासरू आणले. ते त्यावेळी ते फक्त सहा महिन्याचे होते. त्याचे आपल्या मुलीप्रमाणे पालन-पोषण धुमाळ कुटुंबीयांनी केले. आज त्या वासराची गाय झाली आहे. त्याचबरोबर ती सात महिन्याची गाभण आहे. तळहाताच्या फोडा प्रमाणे संगोपन केलेल्या या गाईचे डोहाळे जेवण करण्याचा निर्णय घरातील सर्व मंडळींनी घेतला. आणि लागलीच ही संकल्पना सत्यात उतरवण्यात आली. 
या निमित्ताने गोडधोड पदार्थांचा घरात घमघमाट सुटला. गावातल्या आया-बाया डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी बाळा धुमाळ  यांच्या घरी जमा झाल्या. डोहाळ कार्यक्रमाची वेळ झाली. त्या गाईला  मंडपात बांधण्यात आलं. सुहासिनीने पारंपारिक पद्धतीने गाणी गायली . एकएक करत 21 महिलांनी तिची ओटी भरत तिला ओवाळलं. त्यानंतर पाच प्रकारची फळे गौरीला खाऊ घालण्यात आली .
स्वतःच्या मुलांप्रमाणेच  घुमाळ दाम्पत्य जिव्हाळ्याने पशुधनाचा सांभाळ करतात.  मायेपोटी चक्क  गायीचे डोहाळे पुरवले आणि धुमधडाक्यात गावजेवण दिलं. आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिलं आहे. पण हा कृतज्ञता सोहळा वेगळाच होता.
Comments