अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था आयोजित साहित्य संगम सोहळा उत्साहात संपन्न...
पनवेल वैभव वृत्तसेवा : -
आखिल भारतीय आगरी साहित्य संस्था आयोजित साहित्य संगम सोहळा रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी अलिबाग तालुक्यातील मांडला येथील ग्रीन किंग रिसॉर्ट येथे शेकडो साहित्यिकांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अमृत पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा सौ . मानसी म्हात्रे,संस्था अध्यक्ष कैलास पिंगळे, साहित्यिक सुरेश भोपी , साहित्यिक चंद्रकांत पाटील , आवाज महामुंबईचा चॅनेल चे संपादक श्री मिलिंद खारपाटील , ॲड राकेश पाटील,ज्येष्ठ पत्रकार धम्मशील सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
आगरी भाषा लोप पावणार नाही.एक आगरी ,लाखांना भारी असे संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास पिंगळे सर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
आगरी भाषा जोमाने पुढे जाईल. अनेक नवनवीन पुस्तके आगरी भाषेत येत आहे.नवोदिताचे स्वागत करून, त्यांचे अभिनंदन ऍड मानसी म्हात्रे यांनी केले.तुम्ही उच्चशिक्षीत झाले पाहिजे आणि तुमच्या साहित्यातून तुमचे समृद्ध विचार लोकांपर्यंत पोचवायला हवेत असेही त्या म्हणाल्या.
सुरुवातीला वावे ग्रामस्थांचे सुरेख असे गायन आणि भवर नृत्य झाले.यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शाल, पुष्पगुच्छ,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.यामध्ये जेष्ठ साहित्यिक सुरेश भोपी, कृष्णा जोशी,मारुती बागडे, अरुण द. म्हात्रे, प्रा.संदेश पाटील,जयंत पाटील ,विकास पाटील ,चंद्रकांत कांडपिले यांचा समावेश आहे. अन्यायाला वाचा फोडणाऱ्या निर्भीड रणरागिणी सौ मानसी म्हात्रे यांना सरखेल पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कार्याची उचित दखल घेण्यात आली.
या कार्यक्रमात नंदेश गावंड यांच्या आगरास्त्र या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती गावंड यांनी ओघवत्या शैलीत केले.कार्यक्रमाची सुरेख सांगता सुश्राव्य भजनाने झाली.