गावकीच्या रहदारीच्या रस्त्यातून फार्महाऊसकडे जाणाऱ्या वाहनांच्या ये-जा मुळे ग्रामस्थ त्रस्त...

पनवेल दि.22 (वार्ताहर)- मौजे लहान धामणी येथील गावाच्या मध्यभागातून गावकीच्या रहदारीच्या रस्त्याने फार्महाऊसकडे जाणाऱ्या वाहनांच्या दिवसरात्र ये-जा मुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून वाहनांचे दिवसरात्र आवाज त्यातच अपघात व भांडण होत असल्याने यासंदर्भात शासनाने लक्ष घालावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी पनवेल तहसिलदार, पनवेल पंचायत समिती गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका पोलिस ठाणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
         लहान धामणे गावाच्या पुढे 15 ते 20 फार्महाऊस आहेत. या सर्व फार्महाऊसवर जाण्यासाठी या गावाच्या रहदारीच्या रस्त्याचा वापर ते करतात. हा रस्ता गावाच्या मध्यभागातून जात असल्याने व कायमस्वरूपी गावकीचा रहदारीमुळे रस्त्यावर लहान मुले खेळत असतात तसेच मुकी जनावरेसुद्धा आसपास वावरत असतात. परंतु फार्महाऊस वाल्यांच्या वाहनांमुळे अनेकवेळा छोटे मोठे अपघात होतात. त्याचप्रमाणे वाहनांच्या मोठ्या आवाजामुळे त्रास सुद्धा होतो. अवजड वाहने या ठिकाणाहून येत असल्याने आजूबाजूच्या छोट्या घरांचे नुकसान होते. यातूनच बाचाबाची व मारहाणीच्या घटना घडतात. तरी या सर्व फार्महाऊस वाल्यांना आवश्यक त्या सूचना देऊन येथील रस्ता वापरणे बंद करून पर्यायी रस्ता द्यावा अशी मागणी केली आहे.         
Comments