शिवसेनेमुळे तब्बल ७९ बंधपत्रित आरोग्य सेवकांना मिळणार १६ वर्षांनी न्याय....
पनवेल दि. १४ (वार्ताहर): रायगड जिल्ह्यातील ७९ बंधपत्रित आरोग्य सेवकांना तब्बल १६ वर्षांनी शिवसेनेमुळे न्याय मिळणार असल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे.
           पनवेल येथील शिवसेना स्थानिक नेते व महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे माजी संचालक चंद्रशेखर सोमण यांच्या प्रयत्नांमुळे रायगड मधील आरोग्य सेवकांचा सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल १६ वर्षांनी या मागणीला यश आले असून या बाबत शिवसेनेने निर्णायक प्रयत्न सुरू केले आहेत. १९९० ते २००२ या कालावधीत महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे काँट्रॅक्ट पद्धतीने आरोग्य सेवकांची निवड केली होती. २००५ मधील न्यायनिर्णयानंतर एका शासन आदेशद्वारे तब्बल १३ जिल्ह्यातील आरोग्य सेवकांना सरकारी सेवेत कायम करून वेतन, बढती सह सर्व लाभ देऊ केले. परंतु रायगड मधील ७९ बंधपत्रित आरोग्य सेवकांचा सेवाखंड क्षमापित करून मूळ नेमणूक दिनांकापासून सेवा नियमित करून सेवाज्येष्ठता, पदोन्नती मधील अन्याय दूर होऊन न्याय मिळावा म्हणून आजपर्यंत अनेक वेळा शासन दरबारी पत्र व्यवहार करूनही न्याय मिळत नव्हता. या सर्व आरोग्य सेवकांनी बाबत शिवसेना स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण व मा नगरसेवक प्रथमेश सोमण यांची भेट घेऊन सदर प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली. त्वरित चंद्रशेखर सोमण यांनी आरोग्य विभागाच्या अवर सचिव यांच्याशी चर्चा करून सदर समस्येकडे लक्ष वेधले. त्या वेळी जिल्हा स्तरावरून सदर प्रस्तावच प्राप्त न झाल्याचे कळले. लगेचच सोमण यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी वैशाली पाटील यांच्याशी चर्चा व सतत पाठपुरावा करून अखेरीस हा प्रस्ताव अवघ्या ३ दिवसात तयार करून आज मंत्रालयात मंजुरुसाठी पाठवला आहे. गेली दीड वर्ष हे सर्व आरोग्य अधिकारी कोविड विरुद्धच्या लढ्यात सेवा बजावत असल्याने हा एक मोठा दिलासा शिवसेने तर्फे सदर आरोग्य सेवकांना मिळाला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या संघर्षाला सकारात्मक मार्ग मिळू लागल्याने संपूर्ण रायगडमधील आरोग्य सेवक समाधानी असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सोमप्रकाश राऊळ यांनी सांगितले.
         
Comments