पनवेल, दि. २६ (वार्ताहर) ः यावर्षी महाड, चिपळूण, खेड व कोकणतळ या भागाला महापूराचा जोरदार फटका बसला आहे. प्रतिवर्षीपेक्षा 5 फूट अधिकचे पाणी या गावांतून आले आणि मोठेच नुकसान झाले. संपूर्ण गाव, बााजारपेठा उद्ध्वस्त झाल्या. या बातम्या बघताना 2005 पासून सुरू झालेले पुरसत्र पनवेलकरांच्या डोळ्यांसमोरच होतेच. ते या सगळ्याचेच साक्षीदार होते. त्यामुळे इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या सर्व मैत्रिणींनी अध्यक्षा सुलभा निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तातडीने आपल्या महाडच्या सहभगिनींना मदत पाठवायचे ठरविले.
त्याप्रमाणे फुड पॅकेटमध्ये 1 कि.तांदूळ, पाव कि.डाळ, चहा, साखर, मीठ, मसाला, लोणची, सॉस, बिस्किटे, लाडू पॅकेट 1, चिवडा पॅकेट, ब्रेड, मेणबत्या, सॅनिटरी पॅड पॅकेट, पाणी बाटल्या या गोष्टी प्रामुख्याने होत्या. याचे पॅकींग इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या मेंबर्सनी स्वतः केले. दुसर्या दिवशी क्लब सेक्रेटरी श्वेता वारंगे, ट्रेझरर कांचन मिरवणकर आणि ज्येष्ठ सदस्या अश्विनी जोशी या हे सर्व घेवून महाडला रवाना झाल्या व तेथे त्यांनी त्याचे वितरण यशस्वीरित्या केले. महाड शहरात प्रभात कॉलनी सावित्री रोड आणि तांबड भुवन या ठिकाणी तांबड भुवन तरुण उत्कर्ष मंडळाच्या मुलांच्या साहाय्याने योग्य व्यक्तीना मदत पोहचू शकलो.