पनवेल, दि.१ (संजय कदम) ः पनवेल शहरासह खारघर, कोपर खैरणे, एपीएमसी आदी परिसरात रिक्षासह मोटार सायकल चोरणार्या सराईत अल्पवयीन मुलास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्याच्याकडून 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसापासून पनवेल परिसरात रिक्षासह मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात वपोनि अजयकुमार लांडगे व पोनि ( गुन्हे ) संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि अनिल देवळे, पोउपनि सुनिल तारमळे, पोहवा रविंद्र राऊत, पोशी युवराज राऊत, पोशि सुनिल गर्दनमारे, पोशि विवेक पारासर, पोशि यादवराव घुले, पोना विनोद पाटील, पोना पंकज पवार, पोना गणेश चौधरी, पोशी खेडकर व पोशि साळुखे आदींचे पथक सदर व्यक्तीचा शोध घेत असताना पेट्रोलिंग करण्याच्या दरम्यान अभिलेखावरील विधीसंघर्ष बालक (17 रा.लक्ष्मीनगर झोपडपट्टी) हा चोरीची ऑटो रिक्षा चालवत असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्यास पनवेल बस डेपो येथून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 134/2021 भादवि कलम 379 या गुन्ह्यातील चोरीला गेलेली ऑटो रिक्षा मिळून आली. त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने कोपर खैराने, एपीएमसी व खारघर पोस्टे परिसरातून ऑटो रिक्षा तसेच मोटर सायकल चोरी केले बाबत कबुली दिली आहे. सदर विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून आतापर्यंत 2 लाख 10 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.