उमरोलीच्या रस्त्याचा मार्ग मोकळा, अडथळा काढून टाकण्याचे पनवेल तहसीलदारांचे आदेश....
उमरोलीच्या रस्त्याचा मार्ग मोकळा, अडथळा काढून टाकण्याचे पनवेल तहसीलदारांचे आदेश....

नवीन पनवेल: निधी मंजूर होऊन देखील उमरोली येथील रस्त्याचे काम होत नाही. या रस्त्यावर करण्यात आलेला अडथळा काढून टाकण्याचे आदेश पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी दिले आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्यास भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये कारवाई होऊ शकते. त्यामुळे उमरोलीच्या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
         टेमघर ते उमरोली हा रस्ता उमरोली गावात ये-जा करण्यासाठी मागील तीस वर्षापासून वहिवाटीखाली आहे. हा रस्ता पूर्वापार वहिवाटीचा असून उमरोली गावात ये-जा करण्यासाठी ग्रामस्थ 30 वर्षापासून या रस्त्याचा वापर करत आहेत. या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम शासकीय निधीमधून यापूर्वी वेळोवेळी झालेला आहे. सन 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे येथून प्रवास करणे नागरिकांना जिकिरीचे झाले आहे. टेमघर ते उमरोली रस्ता दुरुस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद रायगड- अलिबाग फंडातून निधी मंजूर झालेला आहे. मात्र हा रस्ता दुरुस्त करण्याचे काम बंद करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होण्याबाबत उमरोली ग्रामपंचायत सरपंच यांनी 15 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाकडे विनंती अर्ज सादर केला होता. त्यानंतर सर्व संबंधितांची बैठक तहसीलदार पनवेल येथे आयोजित करण्यात आली होती. तसेच पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी 16 मार्च रोजी स्थळ पाहणी देखील केली. यावेळी टेमघर ते उमरोली या रस्त्याव्यतिरिक्त उमरोली येथे जाण्यासाठी अन्य मार्ग नसल्याचे निदर्शनास आले आहे.
       त्यामुळे उमरोली गावास ये-जा करण्यासाठी पूर्वापार पासून असलेला वहिवाटीचा रस्ता यामध्ये निर्माण केलेला अडथळा 15 दिवसाच्या आत स्वखर्चाने दूर करावा अन्यथा पंधरा दिवसांची मुदत संपल्यानंतर मंडळ अधिकारी, नेरे यांनी पोलिस संरक्षणसह या जागेवर जाऊन रस्ता खुला करून द्यावा. असा आदेश पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी दिला आहे. त्यामुळे उमरोलीच्या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Comments