आर्या वनौषधीचा वटपौर्णिमा व आयुर्वेद जनजागृती कार्यक्रम.....
पनवेल वैभव :-  वटपौर्णिमेला वटवृक्षाची रोपं लावून व वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा छोटा प्रयत्न आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने करण्यात आला.
वटपौर्णिमेचे औचित्य साधून या वेळी वटपौर्णिमा व आयुर्वेद या विषयावर जनजागृती कार्यक्रमही घेण्यात आला.सदर कार्यक्रमात  आर्या प्रहरचे प्रतिनिधी दत्तू कोल्हे यांच्या हस्ते वडाचे औषधी गुणधर्म व उपयोग या बद्दल माहिती असलेली पत्रके महिलांना  व नागरिकांना वाटप करण्यात आली.
निसर्गताच दीर्घायुषी व धार्मिक महत्व असणाऱ्या वड या वृक्षाचे संवर्धन व जतन व्हावे या हेतूने सदर कार्यक्रम घेण्यात आला.असे संस्थेचे अध्यक्ष व आर्या प्रहरचे संपादक प्रा.सुधीर पाटील यांनी यावेळी सांगितले.पर्यावरणाच्या दृष्टीने वडवृक्षाचे महत्त्व खूपच आहे.वड हा मानवासाठीही खूपच उपयुक्त आहे.या वृक्षांची पाने, फळे, चीक, मुळ औषधात वापरतात. मूत्राघात, श्वेतप्रदर, प्रमेह, मेदवृद्धी, विर्यविकार, जंत, वंध्यत्व, अतिसार, आमांश, व्रण, मूळव्याध, नेत्रविकार, केसविकार, संधिवात आदी अनेक विकारावर वड उपयुक्त आहे असेही सुधीर पाटील यांनी यावेळी सांगितले.
वटपौर्णिमेला वड या वृक्षांची तोड न करण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले होते या आवाहनाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला असेही सुधीर पाटील यांनी या वेळी सांगितले.
 
Comments