इन्फिनिटी फाउंडेशन व नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन......
अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):- मादक व अंमली द्रव्यांच्या अवैध वाहतुकीविरूद्ध कृती आणि अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरूद्ध कृती आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी दरवर्षी दि.26 जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन" म्हणून साजरा केला जातो.
इन्फिनिटी फाउंडेशन,हा नेहरू युवा केंद्र,रायगड शी संबंधित एक युवा गट आहे. यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील झोपडपट्ट्यांमध्ये मादक पदार्थांचा वापर आणि तस्करीविरूद्ध दि. 25 ते 28 जून 2021 या कालावधीत "ड्रग्सबाबतचे सत्य जाणून घ्या,जीव वाचवा" या संकल्पनेसह चार दिवसांची जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या निमित्ताने आज (दि. 25 जून) रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते अंमली पदार्थ विरोधी पोस्टर्सचे जिल्हाधिकारी कार्यालयात अनावरण करून मोहिमेची सुरूवात करण्यात आली.
हे युवक झोपडपट्ट्यांमध्ये पोस्टर लावून तेथील लोकांना "say no to drugs" या संदेशाच्या बॅजच्या वितरणासह मादक पदार्थांच्या वापराच्या धोक्यांविषयी जनजागृती करणार आहेत. त्याचप्रमाणे हे युवक सोशलमीडियाद्वारेही जनजागृती मोहीम राबवित असून त्यांनी या निमित्ताने ऑनलाईन प्रमाणपत्र व शपथ देवून पोस्टर बनविण्याच्या स्पर्धेचेही नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील युवा स्वयंसेवकांचा सहभाग घेऊन या मोहिमेची सांगता दि.28 जून रोजी फेसबुक लाईव्हद्वारे करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी युवकांशी संवाद साधून त्यांना देशभक्ती, सामाजिक कर्तव्य याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत.