आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटर ला आर्थिक मदत देऊन केला शंकर म्हात्रे यांनी वाढदिवस साजरा

सिटी बेल / पनवेल :- शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा सहचिटणीस नगरसेवक शंकर म्हात्रे यांनी पारनेर येथे आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या भव्य दिव्य सेंटरला आर्थिक हातभार लावून स्वतःचा वाढदिवस साजरा केला. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या लॉक डाऊन मुळे कुठल्याही स्वरूपाचे जाहीर कार्यक्रम न करता वाढदिवस साजरा करण्याचे नगरसेवक शंकर म्हात्रे यांनी ठरविले होते. वाढदिवसाचे बीभत्स प्रदर्शन न करता तो लोकाभिमुख कार्यक्रमांतून साजरा करावा ही शेतकरी कामगार पक्षाची शिकवण आहे. माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, जे एम म्हात्रे यांच्या याच शिकवणीनुसार कार्य करणारे नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे यांनी वाढदिवसाच्या औचीत्याने पारनेर येथे आमदार निलेश लंके करत असलेल्या अतुलनीय कार्यामध्ये आपल्या योगदानाची फुल ना फुलाची पाकळी म्हणून पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन वाढदिवस साजरा केला.तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू देखील यानिमित्ताने भेट देण्यात आल्या.यात रेशन साहित्य,फळे,निर्जंतुक द्रव्य यांचा समावेश आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू, नगरसेवक गोपाळ भगत, अर्जुन डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शंकरशेठ म्हात्रे म्हणाले की, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये मनुष्य हानी फार मोठ्या प्रमाणात होत असताना वाढदिवसाचे सोहळे साजरे करणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटत नव्हते. लोकाभिमुख कार्यक्रम जरी करत असलो तरी त्या निमित्ताने गर्दी होणार व विषाणू प्रसार होणार याचे मला परिपूर्ण भान होते. म्हणूनच कोणीतरी आपल्यासारखा सजग कार्यकर्ता करत असलेल्या कार्याला हातभार द्यावा या उद्देशाने मी आमदार निलेश लंके यांच्या भव्य दिव्य अशा कोवीड सेंटरला माझ्या परीने एक छोटीशी भेट देण्याचा प्रयत्न केला आहे.येथील एकंदरीतच नियोजन अत्यंत परिपूर्ण आणि मानवता धर्म जगविण्यासाठी केलेले आहे. विशेष म्हणजे स्वतः आमदार निलेश लंके याच ठिकाणी राहतात आणि रुग्णां समवेत जेवतात सुद्धा. आज येथून पनवेल मध्ये परत जाताना आम्ही एक ऊर्जा घेऊन जात आहोत. अत्यंत संघर्षमय कालखंडात देखील आमदार निलेश लंके यांच्यासारखे लोकप्रतिनिधी जे काम करत आहेत त्याचे कौतुक शब्दात करणे शक्य नाही. शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच लोकांच्या भल्यासाठी आणि त्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी अग्रक्रमी राहिला आहे.
Comments