चिंचपाडा शील येथील रस्त्याचे काम नियमांतर्गत पद्धतीनेच; वडघरच्या माजी सरपंचांनी मांडली ठाम भूमिका...
पनवेल दि.12 (वार्ताहर)- वडघर ग्रामपंचायत हद्दीतील चिंचपाडा शील येथील एका रस्त्याच्या कामा संदर्भात आलेल्या बातम्या या बीनबुडाच्या असून येथील रस्त्याचे काम हे शासकीय नियमांप्रमाणेच केले असल्याची माहितीमाजी सरपंच प्रदीप मुंडकर यांनी दिली.           
या रस्त्याच्या भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भात काही बातम्या प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या व या कामालामाजी सरपंच जयवंत परदेशी यांनी आक्षेप घेतला होता व त्याबाबत काही आरोपही केले होते. याबाबत अधिक माहिती देताना प्रदीप मुंडकर म्हणाले की, या ठिकाणी असणाऱ्या पाच ते सहा घरांना ये जा करण्यासाठी रस्त्याची अत्यंत आवश्यकता होती. परंतु हा डोंगराळ भाग असल्याकारणामुळे या ठिकाणी तातडीने डांबराचा किंवा सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधणे शक्य नव्हते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी तोंडी मागणी केल्यानंतर आम्ही या ठिकाणी दोन थर खडीचे व त्यावर माती सपाटीकरण अशा स्वरूपाचे रस्ता करण्याचे काम मंजूर केले. त्यात 110 मीटर लांबीच्या सदर रस्त्यात दोन मोरींचे बांधकाम देखील झाले आहे. ही कामे आजही कोणासही दिसतील. तथाकथित भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना परदेशी यांनी अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या रंगविल्या आहेत. या रस्त्याचे साठी ग्रामपंचायतीने 2 लाख 35 हजार रुपयांचा निधी खर्चीला असून देखील त्यांनी माध्यमांना 2 लाख 94 हजार अशी वाढवून चढवून रक्कम सांगितली. हे काम नियमाप्रमाणे पूर्ण झाले असून, पंचायत समितीच्या अभियंत्यांचे त्यासाठी प्रमाणपत्र सुद्धा आहे. मूळ ठराव घेताना सुद्धा त्यात खडी थर आणि माती सपाटीकरण असे उल्लेख आहे. त्यात कुठेही डांबरी रस्ता अथवा सिमेंट रस्ता अशी नोंद नाही. त्यामुळेच परदेशी यांचे आरोप तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. तत्कालीन सरपंच रविकांत कमलाकर भोपी म्हणाले की, सदर रस्त्यासाठी परदेशी यांच्या कुटुंबीयांपैकी एका सदस्याने देखील तोंडी मागणी केली होती. सरपंच म्हणून गावातील नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत या भूमिकेतूनच मी कायम काम केले आहे. येथे रस्ता नसल्याकारणाने ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना त्यांच्या घरापर्यंत जाणे जिकरीचे होत असे. त्यामुळे रस्ता उभारण्याची मागणी कोणी केली? या अनाठाई प्रश्नावरून लोकांची दिशाभूल करणे योग्य होणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे.
Comments