पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन तरुणावर प्राणघातक हल्ला

पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः पनवेल भागात राहणार्‍या रविंद्र मंडल (35) याला त्याच्या ओळखीतील त्रिकुटाने पैशाच्या देवाण-घेवाणी वरुन बेदम मारहाण करुन तसेच त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सदर मारहाणीत रविंद्र मंडल गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. 

त्यानंतर पोलिसांनी तिघा मारेकर्‍यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यापैकी दोघांना अटक केली आहे.
सदर घटनेतील गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव रविंद्र मंडल उर्फ लाल्या असे असून त्याचा राजू कुंवर याच्यासोबत पैसे देण्या- घेण्यावरुन वाद झाला होता. राजू कुंवर याला देण्यासाठी असलेले पैसे त्याने दारु पिण्यामध्ये उडवून टाकले होते. त्यामुळे राजू कुंवर, राजू विश्‍वकर्मा आणि त्यांचा तिसरा साथीदार या तिघांनी रविंद्र मंडल याला पनवेल मधील मिरची गल्लीमध्ये अडवून त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी राजू कुंवर याने रविंद्रच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याला मारुन टाकण्याचा प्रयत्न केला. सदर मारहाणीत रविद्र गंभीर जखमी झाल्यानंतर तिघा मारेकर्‍यांनी तेथून पलायन केले होते. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रविंद्र याला उपचारार्थ जे.जे. रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी सदर घटनेतील तिघा मारेकर्‍यांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या मारेकर्‍यांची माहिती मिळवून त्यापैकी राजू कुंवर आणि राजू विश्‍वकर्मा या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आता फरार असलेल्या त्यांच्या साथीदाराचा शोध सुरु केला आहे.
Comments