पनवेल दि.२३ (वार्ताहर): कळंबोली वसाहतीमधून होलसेल आंब्यांची विक्री करणाऱ्या एकाव्यवसायिकाची जवळपास 4 लाख 40 हजारांची फसवणूक झाल्याची घटना अज्ञात त्रिकूटांनी केली आहे.
अनिकेत कन्हेरे या व्यवसायिकाचा मासे व आंबे विक्रीचा होलसेल व्यवसाय आहे. यासंदर्भात त्यांनी एका एपवर जाहिरात टाकली होती. त्या माध्यमातून मुकेश पटेल नामक व्यक्तीने त्याला 900 डझन आंब्याच्या 200 पेट्यांची 2200 प्रमाणे ऑर्डर दिली होती. त्यानुसार त्याने सदर माल हा मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट येथे पोहोचविण्यास गेला होता. परंतु तेथे पावसाचे पाणी भरल्याचे सांगून पेट्या शिवडी-रे रोड येथील बीपीटी टोलनाक्याच्या पुढे आणण्यास सांगितले. त्यानुसार अनिकेत याने सदर माल सलिम नावाच्या व्यक्तीकडे ताब्यात दिला व पैशांची मागणी केली असता क्रॉफर्ड मार्केट येथील कार्यालयात जाऊन पैसे घेण्यास सांगितले. सलिमने अनिकेत सोबत आणखी एकास पाठवले मात्र तिथे गेल्यानंतर मुकेश पटेल याचे ऑफिस नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने याबाबतची तक्रार कळंबोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.