सराईत मोबाईल चोर गजाआड
सराईत मोबाईल चोर गजाआड

पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः रेल्वेतून प्रवाश्यांचे मोबाईल चोरणार्‍या सराईत मोबाईल चोरट्यास वाशी रेल्वे पोलिसांनी जेरबंद करत त्याच्याकडून 41 हजार पाचशे रुपयांचे तीन मोबाईल हस्तगत केले आहेत.
मोहम्मद आजम इस्राईल शाह उर्फ मुन्ना (22) असे याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मदनपुरा भाई चाळ रूम नंबर 07 नागपाडा मुंबई येथील रहिवाशी आहे. वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वपोनि विष्णू केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी सदरची ही कामगिरी केली आहे. वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे घडत असल्याने यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांकडून वाशी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना विशेष सुचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विजय टेळकीकर व गुन्हे प्रकटीकरण पथकातील स्टाफ पोलिस ठाणे हद्दीत गस्त करत असतांना, एक इसम मानखुर्द परिसरात चोरीचे मोबाईल फोन विकण्यास आला आहे अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मानखुर्द येथे जाऊन उपरोक्त आरोपीस ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव मोहम्मद आजम इस्राईल शाह उर्फ मुन्ना, रा. मदनपुरा नागपाडा मुंबई,असे असल्याचे सांगितले. त्याच्या अंगझडतीमधून पोलिसांना 41 हजार पाचशे रुपयांचे तीन मोबाईल फोन मिळून आले. सदरचे मोबाईल फोन त्याने जुईनगर व सानपाडा इत्यादी ठिकाणाहून त्याने रेल्वेतून चोरी केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले. वाशी रेल्वे पोलीस ठाणे येथे याप्रकरणी गुन्हे दाखल असून याबाबत उपरोक्त आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लोहमार्ग मुंबई पोलिस आयुक्त यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार तसेच पोलीस उपायुक्त, मध्य परिमंडळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, हार्बर विभाग व वाशीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू केसरकर यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निरीक्षक मोनाली घरटे, पोलिस उपनिरीक्षक विजय टेळकीकर, एएसआय प्रकाश नलावडे, पोलीस हवालदार खोतकर, हांडे, दराडे, धायतडक, पोलिस शिपाई मनवर, शिंदे, सय्यद, मैंदाड, मारकड व खेत्रे आदींच्या पथकाने सदरची ही कामगिरी पार पाडली. सदरचा हा आरोपी वडाळा व सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून तो काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आलेला होता. मात्र मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात वाशी रेल्वे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याने त्याच्यावर पुन्हा पोलिस ठाण्याची हवा खाण्याची वेळ आली आहे. 
फोटो ः सराईत मोबाईल चोरास गजाआड करताना रेल्वे पोलीस
Comments