कोव्हिड निगेटीव्हचे बनावट रिपोर्टस् बनविणारी टोळी गजाआड ; नवी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
अटक आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी  

पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः  कुठल्याही प्रकारचे स्वॅब न घेता हजार ते अडीच हजार रुपयांमध्ये कोवीड-19चे थायरोकेअर लॅबचे कोव्हिड निगेटीव्ह टेस्ट असल्याचे बनावट रिपोर्ट तयार करुन देणाऱया टोळीतील तिघांना नवी मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने सापळा लाऊन अटक केली आहे. या तिघांच्या मोबाईलमध्ये अनेक व्यक्तींचे बनावट कोव्हिड टेस्ट रिपोर्ट आढळुन आले आहेत. त्यामुळे या टोळीने अनेकांची बनावट कोव्हिड निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट देऊन फसवणुक केली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुन्हे शाखेकडून या तिघांची कसुन चौकशी करण्यात येत आहे.  
खारघर सेक्टर-35 मध्ये राहणारा साजीद दाऊद उपाध्ये (47) हा अडीच हजार रुपयांमध्ये कोवीड-19चे वेगवेगळ्या लॅबचे बनावट कोव्हिड निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट तयार करुन देत असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर यांच्या सुचनेनुसार साजीद उपाध्ये याच्याकडे खाजगी व्यक्तीसह एका पोलीस कर्मचाऱयाला कोव्हिडचे बनावट निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट तयार करुन घेण्यासाठी पाठवून देण्यात आले होते. त्यानुसार या दोघांनी साजीद उपाध्ये याची खारघर सेक्टर-35 मध्ये भेट घेऊन त्याला बनावट कोव्हिड निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट बनवून देण्यासाठी आपले आधारकार्ड व मोबाईल नंबर दिले होते. तसेच त्यासाठी 2 हजार रुपये रोख ऍडव्हान्स म्हणुन दिले होते. त्यानंतर साजीद उपाध्ये याने दोन दिवसानंतर त्यांना रिपोर्ट घेण्यासाठी येण्यास सांगितले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तांबे, सहाय्यक फौजदार संजय पवार व त्यांच्या पथकाने खारघर सेक्टर-35 भागात सापळा लावला. यावेळी साजीद उपाध्ये याने तयार केलेले थायरोकेअर लॅबचे बनावट कोवीड निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट खाजगी व्यक्तीला दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याला अनिकेत दुधावडे (21) याने सदरचे निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट तयार करुन दिल्याचे सांगितले.  त्यानुसार पोलिसांनी अनिकेत दुधावडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर राहुल पांडे (23) याने सदरचे रिपोर्ट तयार करुन दिल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेऊन तिघांवर खारघर पोलीस ठाण्यात फसवणुक व बनावट रिपोर्ट तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. न्यायालयाने या तिघांची येत्या मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.  
चौकट  
या कारवाईत अटक करण्यात आलेला साजीद उपाध्ये हा कोवीड-19चे बनावट निगेटीव्ह रिपोर्टची गरज असलेल्या गिऱहाईकांचा शोध घेऊन त्यांची माहिती तो अनिकेत  दुधावडे याला देत होता. त्यानंतर अनिकेत, राहुल पांडे याला सदरची माहिती देऊन त्याच्याकडून संबधित व्यक्तींचे थायरोकेअर लॅबचे कोवीड-19चे बनावट निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट तयार करुन घेत होता. एक बनावट टेस्ट रिपोर्ट तयार करुन देण्यासाठी हि टोळी एक हजार ते अडीच हजार रुपये संबधितांकडून घेत असल्याचे तपासात आढळून आले आहे. या तिघांच्या मोबाईलमध्ये अनेक व्यक्तींचे बनावट टेस्ट रिपोर्ट आढळुन आले आहेत. त्यामुळे या तिघांनी अशाच पद्धतीने अनेक व्यक्तींना बनावट कोव्हिड टेस्ट रिपोर्ट तयार करुन दिल्याचे तपासात आढळुन आले आहे.
Comments