पनवेल, दि.१० (वार्ताहर) ः कळंबोली वसाहतीत वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने मनसेचे नितीन काळे यांनी संताप व्यक्त केला असून या संदर्भात कळंबोली वासियांच्या भावना पोहोचविण्यासाठी शहराध्यक्ष अमोल बोचरे यांच्या उपस्थितीत वीज वितरण सहाय्यक अभियंता कळंबोली यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कळंबोली वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीतपणे होत नाही. या ठिकाणच्या वीज बिल वसुली चा विचार करीत असताना ग्राहकांना अखंडित स्वरूपात वीज पुरवठा होणे बंधनकारक आहे. एखाद्या दोन वेळा तांत्रिक बिघाड होऊ शकतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. कळंबोली वसाहतीत अक्षरशा विजेचा लपंडाव सुरू आहे. आपली बत्ती वारंवार गुल होत आहे. याबाबतचे कारण ग्राहकांना सांगितले जात नाही. दिवस रात्री केव्हाही वीज पुरवठा बंद होत आहे. सध्या मे महिना चालू असून उष्णतेचा पारा वाढलेला आहे. त्यातच कोरोना ची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने टाळेबंदी जाहीर केलेली आहे. घरातून बाहेर न पडण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. अशा आणीबाणीच्या काळामध्ये आपला वीजपुरवठा केव्हाही खंडित होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा नसल्याने कमालीचे उकड आहेत. त्याचबरोबर या परिसरात कोरोना रुग्णालय आहेत त्याठिकाणीही वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. काही रुग्ण घरच्या घरीच उपचार घेत आहेत. अशा प्रकारे वारंवार बत्ती गुल होत असल्याने त्यांना सुद्धा त्रास होत आहे. विशेष करून सेक्टर 15 आणि 16 या परिसरामध्ये हा प्रश्न अधिकच गंभीर बनलेला आहे. यापुढे कळंबोलीकरांना अशा प्रकारे कोणताही त्रास होता कामा नये त्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आपल्याकडे करीत आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल याची आपण खबरदारी घ्यावी. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास याला पूर्णपणे जबाबदार महावितरण कंपनी असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.