पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मध्ये पोलीस प्रशासनाने वीकेण्ड लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून दोन लाख दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोन लाख 13 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. राज्य शासनाने संचारबंदी आणि वीकेण्ड लॉक डाऊन चालू केलेले असले तरी नागरिक नागरिकांनी ते फारसे मनावर घेतलेले दिसून येत नाही.
सर्रासपणे नागरिक दुचाकी, कार घेऊन रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासन आणि शासनातर्फे करण्यात येत आहे. मात्र नागरिक त्याला जुमानत नाहीत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील आदेशानुसार पनवेल शहर, तालुका, कामोठे, खांदेश्वर, तळोजा, कळंबोली, खारघर, उरण, न्हावा शेवा, मोरा या दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन, मॉर्निंग आणि इवनिंग ऑफ करणारे नागरिक, मास्क न लावणारे नागरिक, सामाजिक अंतर न पाळल्याबद्दल, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सामाजिक अंतर आणि इतर आरोग्यविषयक खबरदारी न घेता चालू ठेवलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून 1 हजार 873 जणांवर कारवाई करण्यात आली. आणि तब्बल 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोनामुळे राज्य शासनाने नियमावली सांगितली आहेत. नागरिकांनी त्याचे पालन करावे. अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडू नये. असे आवाहन शिवराज पाटील- पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2 यांनी केले आहे.