ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत दाखल
पनवेल दि २६ (वार्ताहर):. देशासह राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या ५ दिवसांपासून देशात दररोज ३ लाख कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आहे. अनेक राज्यांत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. या राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी रेल्वे गाड्या धावत आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून सध्या दिवसरात्र रेल्वेची सेवा सुरू आहे.
गेले काही महिने अत्यावश्यक कर्मचार्यांसाठी धावणारी रेल्वे आता ऑक्सिजन पुरवण्यासाठी धावत आहे. रेल्वेला देशाची लाईफलाईन म्हटलं जातं. ऑक्सिजन पुरवठा करून रेल्वे सध्या ही ओळख शब्दश: खरी ठरवत आहे. गेल्याच आठवड्यातून विशाखापट्टणमहून ऑक्सिजन एक्स्प्रेस राज्यात दाखल झाली. नागपूर, नाशिक भागात ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून ऑक्सिजनचे टँकर उतरवण्यात आले. या एक्स्प्रेसमधून राज्याला १०० टनांहून अधिक अधिक ऑक्सिजनचा पुरवठा झाला.
सोमवार दिनांक २६ एप्रिल रोजी दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीत दाखल झाली. सकाळी साडे अकराच्या सुमारास ऑक्सिजनचे तीन टँकर्स घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीत पोहोचली. काल संध्याकाळी गुजरातच्या हापामधून ही एक्स्प्रेस निघाली होती. जामनगरमध्ये असलेल्या रिलायन्स उद्योगातून ऑक्सिजन घेऊन या एक्स्प्रेसनं ८६० किलोमीटर अंतर कापलं. या एक्स्प्रेसमधील टँकर्समधून महाराष्ट्राला ४४ टन ऑक्सिजनचा पुरवठा होईल.
महाराष्ट्रासोबतच देशाच्या इतर राज्यांमध्येही सध्या ऑक्सिजन एक्स्प्रेस धावत आहेत. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये सध्या वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी रेल्वे ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून मदत करत आहे. यामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. यामुळे रेल्वेची लाईफलाईन ही ओळख सार्थ ठरत आहे.