पनवेलमध्ये गोर-गरिबांना मोफत शिव भोजनाचा आधार...
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः लॉकडाऊनमुळे एकीकडे अनेक गोरगरीब जनतेची रोजी जात असताना त्यांच्या रोटीची व्यवस्था शासनाने शिवभोजन थाळीतून केली आहे. आगामी पंधरा दिवस ही थाळी गरीब व गरजू लोकांना मोफत दिली जाणार आहे. त्यानुसार पनवेलमध्ये शिव भोजनालयामध्ये मोफत शिव भोजनाला सुरुवात झाली आहे. शिवभोजनाला गरिबांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यात सर्वत्र 17 शिवभोजन केंद्रे व्यवस्थित कार्यान्वित आहेत. गरजू लोकांना यापूर्वी दहा रुपयांत जेवण देण्याची ही योजना होती. आता यातील बहुतांश थाळ्या मोफत दिल्या जाणार आहेत. याबाबतचे शासनाकडून जिल्हा पुरवठा विभागाला आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील सर्व शिव भोजनालयाना मोफत शिवभोजन सुविधा सुरु करण्याचे सूचित करण्यात आले आहे. पनवेल परिसरातील शिव भोजनालयात मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवभोजन थाळीचा लाभ सध्या अनेक गोरगरीब लोक घेत आहेत. सर्व केंद्रांवर सकाळपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत थाळ्या संपलेल्या असतात. पूर्ण पंधरा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेकांचा रोजगार या काळात बुडणार आहे. अशा वेळी पोटासाठी या शिवभोजन थाळीचा आधार कष्टकरी व गरजू लोकांना मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचे स्वागत केले जात आहे.

शासनाच्या नियमानुसार शिवभोजन....
शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांचे ऑनलाईन मोबाईल अप्लिकेशनवर फोटो घेऊन सर्व सुरक्षितता पाळून थाळीचा लाभ घेणारे शिवभोजन थाळीचे वाटप वेळेत सुरु आहे. त्याचा फायदा गरीब -गरजूना होत आहे.
- नितीन तांबोळी, दत्तकृपा खानावळ, शिवभोजन पनवेल

शिवभोजनाचा लाभ घेणारे....
भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरर्निवाह चालवितो. घरात कोणीही कर्ता पुरूष नाही. परंतु, शासनाने मोफत जेवन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे माहिती झाल्याने घरातील काही जणांना तरी त्या केंद्रातून जेवण मिळेल. उर्वरित आम्ही घरी मिळेल ते करून खावू. - शकुंतला तडवी, पनवेल

दिवसभर घर चालविण्यासाठी राबण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शिवभोजन थाळीतून थोडे पैसे शिल्लक राहतात. लॉकडाऊनमुळे आता काम मिळणार नाही. त्यात मोफत भोजन मिळणार असेल तर चांगली गोष्ट आहे.
- प्रतीक गीते, पनवेल

अगोदरपासूनच कमी पैशात भोजन मिळत होते. आता लॉकडाऊन काळात ते भोजन मोफत मिळणार असेल तर अनेक गोरगरीबांना आधार मिळेल.
- संदीप बोकाडे - पनवेल

Comments