लाडीवली गावातील महिलांचा हंडा मोर्चा ; शुद्ध व नियमित पाण्यासाठी आक्रोश...


कळंबोली / (वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील लाडीवली गाव व आदिवासी महिला  व ग्रामस्थांनी  ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे यांना वारंवार कळवून देखील शुद्ध व नियमित पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मिळत नसल्याने महिला वर्गांमध्ये कमालीचे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामपंचायत व पनवेल पंचायत समितीला वारंवार कळवूनही शासनाच्या नियमानुसार पाण्याचे वितरण होत नसल्याने आज अखेर लाडवली गाव व आदिवासी वाडीतील महिलांनी हंडा मोर्चा काढून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना एक लेखी निवेदन देऊन कायमस्वरूपी शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
        
शासन निर्णयाप्रमाणे  ग्रामपंचायतीने आपल्या  निधीतून पन्नास टक्के निधी हा पाणी व स्वच्छतेसाठी वापरणें बंधनकारक असतानाही  लाडीवली व आदिवासी वाडीत आठ ते दहा दिवसांतून एकदाच पाणी येत आहे.तेही दूषित (पाण्यात जंतू असतात) आणि तरीही प्रतीकुटुंब १००/- रुपये पाणीपट्टी घेतली जात आहे. लाडीवली गावात सुमारे एक लाख लिटर साठवण क्षमतेची पाण्याची टाकी असतानाही गावकऱ्यांना शुद्ध व नियमित पाणी येत नाही. याबाबत ग्रामपंचायत व पनवेल पंचायत समितीकडे वारंवार लेखी पत्रव्यवहार करूनही येथील महिलांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. अखेर आज अडीचशे महिलांनी पनवेल पंचायत समिती वर हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. यावेळी विविध घोषणांनी पंचायत समितीचा परिसर दणाणून सोडला .यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .या गावात कायमस्वरूपी पाण्याची समस्या सुटावी यासाठी एक लेखी निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले असून यामध्ये पुढील मागण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
त्यामध्ये पाणी प्रश्नाबाबत आपण व  पाणी पुरवठा विभाग (जि. प. रायगड) अधिकाऱ्याची लाडीवली व आदिवासी वाडी ग्रामस्थानसोबत  तात्काळ बैठक घेण्यात यावी .
मौजे लाडीवली गाव  आणि आदिवासी वाड्यांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा होणेसाठी लाडीवली गावात असलेल्या साठवण टाकीतून स्वतंत्र जल वाहिनीद्वारे पाणी  देण्यात यावे व पाण्याचे वेळापत्रक निश्चित करून ग्रामस्थाना सूचित करावे, मौजे लाडीवली व शेजारी असलेल्या आदिवासी वाडीसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून या योजनेमार्फत एम.आय.डी.सी.चे पाणी देण्यात यावे ,  जोपर्यंत नवीन स्वतंत्र जिल्हा पुरवठा योजना कार्यान्वित होत नाही तोपर्यंत लाडीवली गावात असलेली साठवण टाकी किमान प्रत्येक महिन्यातून  स्वच्छ करून बाबतची माहिती लाडीवली ग्रामस्थांना देण्यात यावी , १५ व्या वित्त आयोगातून लाडीवली गाव व शेजारी असलेल्या आदिवासी वाड्यांसाठी कोणकोणती कामे करण्यात आली आहेत व येणार आहेत याची माहिती समस्त गावकऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी फलक (बॅनर ) लावून कळविण्यात यावे अश्या स्वरूपाच्या सामाजिक हितांच्या मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. जरी या मागण्यांची पूर्तता पंधरा दिवसात झाली नाही  तर  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांचे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा  लेखी इशारा  दिला  आहे .  

सदर निवेदन देताना  प्रभावती कार्लेकर, ग्राम पंचायत सदस्या ,सुरेखा वाघे, विजया विजय मांडवकर , ज्योती जयवंत पाटील व इतर २५० ग्रामस्थ महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
Comments