बल्लाळेश्‍वर तलावाच्या भोवताली असलेल्या मॉर्निंग वॉक ट्रॅकवर पायर्‍या बसविण्याची मागणी

पनवेल / दि.31 (वार्ताहर) :-  पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येत असलेल्या बल्लाळेश्‍वर तलावाच्या भोवताली मॉर्निंग वॉक ट्रॅकवर वेगवेगळ्या ठिकाणी पायर्‍या बसविण्याची मागणी या परिसरात दररोज फेरफटका मारणार्‍या नागरिकांनी याबद्दलचे निवेदन पनवेल महानगरपालिकेला दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका व शासनाच्या वतीने पनवेल येथील बल्लाळेश्‍वर लेकच्या भोवती मॉर्निंग वॉक ट्रॅक हा चांगला व स्तुत्य प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचा फायदा दररोज मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिकांना होत आहे. परंतु काही अत्यावश्यक असल्यास किंवा काही घटना घडल्यास या मार्गिकेवर पर्यायी मार्ग नाही. तरी त्या संदर्भात नियोजन करावे. 

या ट्रॅकच्या बाजूला धार्मिक विधी करण्याचा घाट होता तो सुद्धा बंद झाला आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्गिका काढावी. त्याचप्रमाणे वीर सावरकर चौकावरुन वडाळे तलाव रोडवर व नवीन पनवेलकडून येणारा रोड या जंक्शनवर मॉर्निंग वॉक ट्रॅकवर पायर्‍या उभारल्यास अनेकांचे सोयीचे होईल, तरी सध्या काम सुरू असल्याने या संदर्भात नागरिकांची अडचण लक्षात घेवून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Comments