गोल्डन ग्रुपच्या अध्यक्ष पदी मंदार दोंदे यांची एकमताने निवड.

पनवेल / वार्ताहर :-
          सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोल्डन ग्रुप च्या नवीन कार्यकारिणीची निवड रविवारी संध्याकाळी रिटघर येथे संपन्न झाली.सिटी बेल वृत्त समूहाचे,समूह संपादक मंदार दोंदे यांची अध्यक्ष पदासाठी एकमताने निवड करण्यात आली.गोल्डन ग्रुपच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात सदस्यांनी सहकुटुंब सहभाग नोंदवत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
        मंदार दोंदे यांनी यापूर्वी गोल्डन ग्रुप चे सरचिटणीस पद यशस्वीरित्या भूषविले आहे. गोल्डन ग्रुपचे सल्लागार तथा संस्थापक निलकंठ शेठ भगत यांनी त्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन मंदार दोंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी उपाध्यक्षपदी जितेंद्र भगत, सरचिटणीस पदी राम पाटील, खजिनदार म्हणून संजय कोलकर, सचिवपदी विजय पवार तर सहसचिवपदी तुळशीराम सत्रे यांच्या नावांची घोषणा निळकंठ शेठ भगत यांनी केली.
        गोल्डन ग्रुप ने यापूर्वी दुर्गम व आदिवासी बहुल विभागांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचे काम सातत्याने केले आहे.दुर्गम विभागातील जिल्हा परिषदांच्या शाळांची पुनर्बांधणी करण्याचे महत्त्वाचे काम देखील गोल्डन ग्रुप ने करून दाखविले आहे. प्रतिवर्षी वृक्षारोपण व लावलेल्या वृक्षांचे संवर्धन हे गोल्डन ग्रुपचे अभियान नेहमीच नावाजले जाते.अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंदार दोंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की गोल्डन ग्रुप सेवाभावी संस्था असली तरी एखाद्या परिवारा प्रमाणे सारे सदस्य एकत्र व एकोप्याने काम करत असतात. गोल्डन ग्रुपचा हाच एकोपा अबाधित ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम आयोजित करण्यावर आमचा भर असेल.
Comments