सकल मराठा समाज मंडळाचा सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा ; माजी सैनिक प्रदीप डावकर यांना 'मराठा भूषण २०२६' पुरस्कार प्रदान
पनवेल /प्रतिनिधी : -
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी, पनवेल तर्फे सहावा वर्धापन दिन सोमवारी, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मराठा भवन, सेक्टर-९, खांदा कॉलनी येथील मंडळाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री सत्यनारायण महापूजेने झाली. त्यानंतर संत जनाई महिला भजन मंडळाची भजन संध्या झाली. यानंतर प्रमुख कार्यक्रम म्हणून विद्यार्थी-पालक गुणगौरव सोहळा पार पडला. यामध्ये दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्यावर मेहनत घेणाऱ्या पालकांचा गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी मंडळातर्फे सालाबादप्रमाणे दिला जाणारा मानाचा "मराठा भूषण २०२६" हा पुरस्कार मंडळाचे सदस्य, माजी सैनिक मा. श्री. प्रदीप डावकर यांना प्रदान करण्यात आला.याच कार्यक्रमात मराठा समाजाचे रायगड जिल्हा समन्वयक गणेश कडू यांची पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी आपल्या निवेदनात मंडळाच्या संपूर्ण कार्यकाळाची माहिती दिली. मंडळाने समाजासाठी केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी यावेळी सादर केला.
या कार्यक्रमास सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीचे कार्यकारी मंडळ, सर्व सदस्य, समाज बांधव, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनाने सोहळ्याची सांगता झाली.