गणेशोत्सवासाठी कोल्हापूरकर चाकरमान्यांना मोफत बससेवा..
आमदार प्रशांत ठाकूर व विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने पनवेलहून सहा बस रवाना...
पनवेल /प्रतिनिधी - :
गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या कोल्हापूरकर चाकरमान्यांना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांनी अनोखी आणि मोठी भेट दिली आहे. कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ, मुंबई महानगरच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत दोन्ही आमदारांच्या माध्यमातून पनवेलहून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमामुळे पनवेल, खारघर, कामोठे आणि कळंबोली परिसरात वास्तव्यास असलेल्या कोल्हापूरकरांना गणेशोत्सवात आपल्या गावी जाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड आदी भागांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली.
शनिवार, १२ सप्टेंबर रोजी कामोठे ब्रिजखाली सायंकाळी सात ते दहा या वेळेत प्रवाशांसाठी सहा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी नारळ फोडून तसेच बसला हिरवा झेंडा दाखवून या बसेस रवाना केल्या. या उपक्रमाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वाढीव बसभाड्याचा फटका टाळण्यासाठी पुढाकार..
गणेशोत्सवाच्या काळात खासगी बसधारकांकडून 'सीझन'च्या नावाखाली वाढीव भाडे आकारले जाते. त्यामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांच्या खिशावर मोठा आर्थिक भार पडतो. ही अडचण लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघाने विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला. अखेर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेत मोफत बससेवेचा उपक्रम राबवून कोल्हापूरकरांना मोठा दिलासा दिला.
या उपक्रमाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अनिल पाटील व पदाधिकाऱ्यांनी दोन्ही आमदारांचे आभार मानले.
प्रवाशांसाठी लकी ड्रॉ अन् पैठणीची भेट...
मोफत प्रवासासोबतच प्रवाशांच्या आनंदात भर घालण्यासाठी यावेळी लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले होते. लकी ड्रॉमधील विजेत्यांना आकर्षक पैठणी भेट देण्यात आल्या. त्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहाला आणखी उधाण आले.
या उपक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष अनिल शालन मारुती पाटील यांच्यासह शिवप्रसाद निकम,ब्रह्म सावंत, अमोल असूळकर, दयानंद पाटील, विजय खोत, संभाजी खवनेवाडकर, संतोष पाटील, रामदास सावंत, सागर जाधव, आनंदा चव्हाण, सुरेश सडोलीकर, एन. डी. वाघ, सौ. गीता रक्ताडे, रंजना सडोळीकर, शर्वरी निकम, दिपाली कुपेकर, नेत्राताई पाटील, विनोद कुलकर्णी, श्री. मारुती खांबल, दशरथ गावडे, संजय पाटील (महाराष्ट्र पोलीस), संजय पाटील, दिगंबर होडगे, मानसिंग पाटील, भारत देवळेकर, दादासो पाटील, सरदार चिले, अक्षय पाटील, बाळासाहेब शिंत्रे, मारुती मेंगुलकर, बाळासाहेब लोखंडे, विठ्ठल पाटील, लव्हु पाटील, अमोल भोपळे, गौरेश रोडे, आकाश पाटील, बाबुदा जाधव तसेच समस्त पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.
हे कार्य इथपर्यंत थांबणार नाही" — आमदार विक्रांत पाटील
"हे आमचं कार्य इथपर्यंत थांबणार नाही. कोल्हापूरवासीयांसोबत आमचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी यापुढेही त्यांच्या भेटीगाठीचे कार्यक्रम सुरू राहतील. त्यांच्या संघटनेला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर आमच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ती नक्की केली जाईल. संघटना मजबूत, बळकट आणि ताकदवान करण्यासाठी तसेच तिला पाठिंबा देण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन," असे आश्वासन आमदार विक्रांत पाटील यांनी यावेळी दिले