शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी मुबंईतील सिडको एक्झिबिशन अँड कॉन्व्हेंशन सेंटर येथे होणार लढत
मिक्स्ड मार्शल आर्टस् स्पर्धेत १३ व्यावसायिक लढती होणार
WDS तर्फे २४ स्पर्धांचे आयोजन, १८०० हून अधिक व्यवसायिक स्पर्धा संपन्न
मुंबई, (पनवेल वैभव) २८ ऑगस्ट २०२६ : -
भारतातील वेगाने वाढणारी आणि आघाडीची MMA (मिक्स्ड मार्शल आर्ट्स) स्पर्धा 'वॉरियर्स ड्रीम सिरीज' (WDS) च्या 'फाइट नाईट 18'चे आयोजन २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील CIDCO एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेपूर्वी WDS तर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी 'फाइट नाईट 18' मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आपल्या तयारीबाबत, आगामी सामन्यांबाबत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरुद्ध व्यावसायिक MMA स्पर्धेत सहभागी होण्याच्या अनुभवाबद्दल आपले मत व्यक्त केले.
'फाइट नाईट 18' मध्ये एकूण १३ व्यावसायिक MMA लढती होणार आहेत. भारतासह आशियातील विविध देशांतील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यामध्ये भारताच्या खेळाडूंच्या फिलिपिन्स आणि रशियातील खेळाडूंविरुद्ध लढती होणार आहेत.
या स्पर्धेतील प्रमुख लढतींपैकी भारताचा जेको लैश्राम फिलिपिन्सच्या किम्बर्ट अलिंटोजोन याच्याशी फ्लायवेट गटात लढणार आहे. तसेच तरुण एम. हिरमठ आणि गगनपाल सिंग दुआ यांच्यात लाईट हेवीवेट गटात सामना होणार आहे. भारतीय खेळाडूंना देशाबाहेरील मजबूत खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळावी, हा WDSच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग आहे.
WDSचे संस्थापक संजिवन पडवळ म्हणाले, "WDSच्या माध्यमातून भारतीय MMAला जागतिक दर्जाचे व्यासपीठ देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. खेळाडूंचा विकास, उत्तम नियोजन, स्पर्धेची निर्मिती आणि प्रेक्षकांचा चांगला अनुभव यावर आमचा विशेष भर आहे. भारतात व्यावसायिक MMAबद्दल अधिक जागरूकता निर्माण करून या खेळामागील शिस्त, कौशल्य आणि मेहनत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी देत भारतीय MMAला जागतिक स्तरावर नेण्याचा आमचा दीर्घकालीन प्रयत्न असल्याचे WDS ने सांगितले.
WDSचे संस्थापक आणि प्रमोटर सुधांशू श्रीवास्तव म्हणाले, "फाइट नाईट 18 साठी आम्ही उत्सुक आहोत. खेळाडूंचा उत्साह, मेहनत आणि जिद्द प्रत्येक फाइट नाईटला खास बनवते. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सहभागामुळे यावेळी स्पर्धेला आणखी चांगली रंगत येणार आहे. खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी आणि MMA चाहत्यांशी जोडले जाण्यासाठी योग्य व्यासपीठ देणे, हे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
WDSचा उद्देश केवळ स्पर्धा आयोजित करण्यापुरता मर्यादित नसून भारतातील व्यावसायिक MMA आणि कॉम्बॅट स्पोर्ट्सला मजबूत व्यासपीठ देण्याचा आहे. खेळाडूंना आपल्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी, देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सक्षम खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळावी, असे कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी सांगितले.