धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही वाढतेय फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण ; तज्ज्ञांनी सांगितले ही धोक्याची लक्षणे..
धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही वाढतेय फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण ; तज्ज्ञांनी सांगितले ही धोक्याची लक्षणे

फुफ्फुसाच्या कर्करोगाकडे केवळ “धूम्रपान करणाऱ्यांचा आजार” म्हणून पाहणे योग्य नाही - डॉ मुकुल थोरात


नवी मुंबई (पनवेल वैभव ) : 
सध्या फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल बोलताना धूम्रपान हा सर्वात मोठा धोका मानला जातो. मात्र, “मी कधीच धूम्रपान केले नाही, त्यामुळे मला फुफ्फुसाचा कर्करोग होणार नाही” हा समज आता धोकादायक ठरू शकतो. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्येही या आजाराचे निदान होत असून, वाढते वायू प्रदूषण, सेकंड हॅंड स्मोकींग, कामाच्या ठिकाणी होणारा घातक पदार्थांचा संपर्क , घरातील जैवइंधनाच्या धुराचा संपर्क आणि अनुवंशिकता यांसारखे घटक त्यामागे कारणीभूत ठरत आहेत. विशेषतः साधा खोकला किंवा दम लागणे म्हणून दुर्लक्षित केली जाणारी लक्षणे दीर्घकाळ कायम राहिल्यास त्याची कारणे तपासणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

फुफ्फुसातील असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ होऊन गाठ तयार झाली की फुफ्फुसाचा कर्करोग होतो. धूम्रपान हे आजही या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण मानले जाते. मात्र, धूम्रपानाचा कोणताही इतिहास नसलेल्या व्यक्तींमध्येही डॉक्टरांना या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे धूम्रपानाव्यतिरिक्त असलेल्या इतर धोक्यांची माहिती असणे आणि सुरुवातीची लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे ठरते.

तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहणारा खोकला, खोकताना रक्त येणे, छातीत दुखणे, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणे, दम लागणे, आवाजात सतत बदल होणे किंवा वारंवार छातीत संसर्ग होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः ही लक्षणे काही आठवडे कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 न्यूईरा हॉस्पिटलचे सर्जिकल ऑन्कोलॅाजीस्ट डॉ. विवेक सुकुमार म्हणाले, धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण असले तरी धूम्रपान करत  नसलेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सेकंड हॅंड स्मोकींग, वाढते वायू प्रदूषण, जैवइंधनामुळे निर्माण होणारा घरातील धूर, अॅस्बेस्टॉस आणि सिलिका यांसारख्या रसायनांचा व्यावसायिक संपर्क, रॅडॉन वायू तसेच अनुवंशिकता यांसारख्या अनेक कारणांमुळे धोका वाढू शकतो.

धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना ते स्वतः देखील या आजाराच्या धोक्यात असू शकतो, याची कल्पना नसते. त्यामुळे लक्षणे दिसल्यानंतरही फुफ्फुसाचा कर्करोग असण्याची शक्यता त्यांच्या लक्षात येत नाही आणि निदानास विलंब होतो. तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहणारा खोकला, कारण नसताना दम लागणे, छातीत दुखणे, आवाजातील सततचा घोगरेपणा, खोकल्यातून रक्त येणे किंवा कोणतेही कारण नसताना वजन कमी होणे याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी आवश्यक तपासण्या, सोनाग्राफी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास उपचारांच्या परिणामांमध्ये मोठा फरक पडू शकतो,असे त्यांनी सांगितले.

फुफ्फुसाच्या कर्करोगाचा प्रकार आणि त्याची अवस्था यानुसार उपचारपद्धती ठरवली जाते. यामध्ये शस्त्रक्रिया, रसायनोपचार, किरणोपचार, टार्गेटेड थेरेपीद्वारे केले जाणारे उपचार आणि रोगप्रतिकारशक्तीवर आधारित उपचारांचा समावेश असू शकतो. यामुळे रुग्णाचे आयुष्य वाढवण्यासोबतच जीवनमान सुधारण्यासही मदत होऊ शकते.

 न्यूईरा हॉस्पिटलचे पल्मनोलॅाजीस्ट ॲण्ड इंटेसिव्हिस्ट डॉ. मुकुल थोरात म्हणाले, धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये होणारा फुफ्फुसाचा कर्करोग हा धूम्रपानाशी संबंधित कर्करोगापेक्षा काही बाबतीत वेगळा असतो. अनेकदा या रुग्णांमध्ये आजाराचे निदान प्रगत अवस्थेत होते. कारण सुरुवातीची लक्षणे सामान्य श्वसनविकारांसारखी दिसू शकतात आणि त्यामुळे मोलाचा वेळ निघून जातो.

आज फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी त्यांच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये असलेल्या जनुकीय बदलांनुसार (genetic profile) उपचार ठरवले जात आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना अधिक योग्य उपचार मिळून आयुष्य वाढण्यास आणि जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे. सतत येणारा खोकला, आवाजात बदल, थकवा, घरघर यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे, तंबाखूच्या धुराशी संपर्क टाळणे, संतुलित आहार व नियमित व्यायामासह निरोगी जीवनशैली राखणे आणि लक्षणे कायम राहिल्यास वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे टाळता येण्याजोगे सर्वात मोठे कारण असले तरी हा आजार धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाकडे केवळ “धूम्रपान करणाऱ्यांचा आजार” म्हणून पाहणे योग्य नाही. जोखीम घटक समजून घेणे, धोक्याची लक्षणे वेळीच ओळखणे आणि तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेणे यामुळे आजाराचे वेळीच निदान होऊन प्रभावी उपचाराची संधी वाढते.
Comments