नवी मुंबईत प्रथमच गळ्यावर कसलाही व्रण किंवा छेद न करता केली थायरॉईड शस्त्रक्रिया ; खारघरच्या मेडिकव्हर रुग्णालयात यशस्वी उपचार....
नवी मुंबईत प्रथमच गळ्यावर कसलाही व्रण किंवा छेद न करता केली थायरॉईड शस्त्रक्रिया

खारघरच्या मेडिकव्हर रुग्णालयात यशस्वी उपचार
 
नवी मुंबई (पनवेल वैभव ) : – मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे पहिल्यांदाच अत्याधुनिक ट्रान्सओरल एंडोस्कोपिक व्हेस्टिब्युलर अप्रोच थायरॉईडेक्टॉमी (TOEVA) या पद्धतीद्वारे एका ३० वर्षीय महिलेवर यशस्वीपणे पूर्णपणे व्रणरहित (Scarless) थायरॉईड शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या गळ्यावर कोणतीही दृश्यमान जखम न राहता थायरॉईडमधील गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली.

 पेण येथील गृहिणी असलेल्या रुग्ण नेहा सिंग  (नाव बदललेले) गेल्या दोन वर्षांपासून मानेवर गाठ असल्याचे जाणवत होते. या गाठीमुळे ती शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक तणावालाही सामोरी जात होती. शस्त्रक्रियेनंतर गळ्यावर कायमस्वरूपी व्रण राहील या भीतीमुळे तिचा आत्मविश्वास कमी झाला होता आणि त्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासही टाळाटाळ करत असत.

कुटुंबीयांनी विविध ठिकाणी उपचारांचा शोध घेतल्यानंतर त्यांनी मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राहुलकुमार नारायण चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. आवश्यक तपासण्या व समुपदेशनानंतर रुग्णेला तोंडावाटे केली जाणारी अत्याधुनिक व्रणरहित थायरॉईड शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला.

 डॉ. राहुलकुमार नारायण चव्हाण यांनी सांगितले की  रुग्णाला थायरॉईडमधील गाठ होती आणि गळ्यावर व्रण राहण्याची तीव्र चिंता होती. तपासणीनंतर ही गाठ सौम्य स्वरूपाची (Benign Tumour) असल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्ही ट्रान्सओरल एंडोस्कोपिक व्हेस्टिब्युलर अप्रोच थायरॉईडेक्टॉमी (TOEVA) ही पूर्णपणे व्रणरहित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सौंदर्यदृष्ट्या गळ्यावर कोणतीही खूण न राहणे हे या रुग्णेसाठी महत्त्वाचे होते. पारंपरिक थायरॉईड शस्त्रक्रियेमध्ये गळ्यावर स्पष्टपणे दिसणारा व्रण राहतो, ज्याचा मानसिक आणि सामाजिक परिणाम विशेषतः तरुण रुग्णांवर होऊ शकतो.

 डॉ. चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, ही शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्यपूर्ण असून तोंडावाटे मर्यादित जागेत आधुनिक एंडोस्कोपिक उपकरणं आणि कॅमेऱ्याच्या सहाय्याने केली जाते. रोबोटिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत ही अधिक किफायतशीर असून उत्कृष्ट सौंदर्यात्मक परिणाम देते. या रुग्णेची संपूर्ण थायरॉईड ग्रंथी तोंडावाटे काढण्यात आली. त्यामुळे गळ्यावर कोणतेही व्रण आढळून आले नाही. परिणामी रक्तस्त्राव कमी झाला, वेदना कमी झाल्या आणि शारीरिक तसेच मानसिक पुनर्वसन अधिक जलद गतीने झाले.सुमारे तीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर रुग्णेची प्रकृती उत्तम असून तिला जखमेची खूण राहिलेली नाही.

रुग्णेने आपल्या अनुभवाबद्दल सांगताना म्हटले, माझ्या गळ्यावर गाठ आढळल्यानंतर मी खूप घाबरले होते. योग्य डॉक्टरांच्या शोधात असताना आम्ही डॉ. राहुलकुमार चव्हाण यांना भेटलो. त्यांनी उपचाराची संपूर्ण माहिती देऊन माझा आत्मविश्वास वाढवला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि माझ्या गळ्यावर कोणताही व्रण राहिलेला नाही. मी मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानते.

 *खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे सेंटर हेड संदीप जोशी म्हणाले,* प्रगत आणि रुग्णकेंद्री आरोग्यसेवा देण्याचा आमचा मानस आहे. व्रणरहित थायरॉईड शस्त्रक्रिया ही केवळ वैद्यकीयदृष्ट्या नव्हे तर रुग्णाचा आत्मविश्वास आणि भावनिक आरोग्यासाठीही महत्त्वाची ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ आणि उत्तमोत्तम सेवेच्या माध्यमातून सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.

 *तज्ज्ञांच्या मते,* भारतात अद्यापही व्रणरहित थायरॉईड शस्त्रक्रियेबाबत जनजागृती कमी आहे. अत्यंत मर्यादित तज्ज्ञांकडून ही शस्त्रक्रिया केली जाते. मात्र अशा यशस्वी उपचारांमुळे रुग्णांना आधुनिक आणि सौंदर्यदृष्ट्या सुरक्षित उपचार पर्याय उपलब्ध असल्याची माहिती अधिक व्यापकपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.
Comments
Popular posts
लिफ्टमध्ये अडकलेल्या ४ तरुण-तरुणींची अग्निशमन दलाकडून सुटका...
Image
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची कमाई ...
Image
महिलेची हत्या करण्यामध्ये आरोपीसोबत सहभागी असलेल्या प्रेमिकेस गुन्ह्यातील गाडीसह घेतले ताब्यात...
Image
भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न..
Image
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजे येथे भव्य वृक्षारोपण अभियान ; शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Image