वाशीतील न्यूईरा हॉस्पिटलचे डॉक्टर ठरले ‘देवदूत’; अपघातग्रस्त तरुणांचे वाचवले प्राण..
रात्रीच्या भीषण अपघातात गंभीर जखमी रुग्णांना गोल्डन अवरमध्ये केले रुग्णालयात दाखल
वेळीच उपचारांमुळे जीवावर बेतणारा धोका टळला
पनवेल वैभव / नवी मुंबई - : पाम बीच रोडवर उशिरा रात्री झालेल्या भीषण दुचाकी-चारचाकी अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी न्युईरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे अपघातग्रस्त रुग्णांचा प्राण वाचविण्यात यश आले. या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
१२ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास नेरुळहून वाशीच्या दिशेने जात असताना न्यूईरा हॉस्पिटलच्या क्लिनिकल कोऑर्डिनेटर डॉ. स्नेहा थोरवे यांनी हा अपघात पाहिला. एका दुचाकी आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक होऊन मिलिंद मोरे (३१) आणि अतुल कुमार (२८) (रुग्णांची नावं बदललेली आहेत ) हे दोघे रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाला होता आणि त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. स्नेहा थोरवे यांनी क्षणाचाही विलंब न करता दोघांना रिक्षामधून तातडीने न्यूईरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयात पोहोचताच आपत्कालीन विभागाने तात्काळ उपचार सुरू केले. न्यूरोसर्जन डॉ. सुनील कुट्टी यांच्या देखरेखीखाली दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले.
न्यूरोसर्जन डॉ. सुनील कुट्टी यांनी सांगितले की, रुग्ण मिलिंद मोरे यांना अनेक गंभीर दुखापती झाल्या होत्या, तर रुग्ण अतुल कुमार यांना डोक्याला गंभीर इजा झाली होती. तत्काळ एमआरआय आणि सीटी स्कॅनसह आवश्यक तपासण्या करून उपचारांना सुरुवात करण्यात आली. बेशुद्धावस्था, स्मृतिभ्रंश, आकडी येणे, मेंदूला सूज किंवा रक्तस्राव, पक्षाघात किंवा कोमा यांसारख्या गुंतागुंती टाळण्यासाठी सातत्याने त्यांच्या प्रकृतीचे निरीक्षण करण्यात आले. सुरुवातीला ही स्थिती गंभीर होती, पण वेळीच उपचार मिळाल्याने दोघांची प्रकृती सुधारली.
काही दिवसांच्या उपचारांनंतर आणि काळजीपूर्वक निरीक्षणानंतर दोघांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून पूर्णपणे बरे होईपर्यंत विश्रांती आणि नियमित फॉलोअपचा सल्ला देण्यात आला आहे.
या घटनेबद्दल डॉ. स्नेहा थोरवे म्हणाल्या, डॉक्टर म्हणून मला माहित होते की अपघातानंतर प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. अपघातग्रस्त तरुण गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना तातडीने मदतीची गरज होती. मी केवळ माझं कर्तव्य पार पाडत त्यांना वेळेत रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला.
अपघातातून बचावलेल्या मिलिंद मोरे(नाव बदललेलं आहे) सांगतात, त्या रात्रीने माझं आयुष्य बदललं. मला फारसं काही आठवत नाही, पण माझी अवस्था किती गंभीर होती हे मला शुध्दीवर आल्यानंतर समजलं. डॉ. स्नेहा यांनी प्रसंगावधान राखत वेळीच मदत केली म्हणून आज आम्ही या संकटावर मात केली.न्यूईरा हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने आम्हाल नवे आयुष्य मिळवून दिले असून त्यांचेही मिलींद मोरे यांनीआभार मानले.
न्युईरा हॉस्पिटलचे उपाध्यक्ष आणि सीईओ डॉ. माताप्रसाद बी गुप्ता यांनी सांगितले की, प्रसंगावधान राखत वेळीच उपचार मिळाल्यास एखाद्याचा अमूल्य जीव वाचू शकतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वेळीच रुग्णालयात पोहोचवणे गरजेचे असून त्यामुळे पुढील उपचार शक्य होतात. ही घटना केवळ वैद्यकीय तत्परतेचेच नव्हे तर मानवतेचेही उत्तम उदाहरण ठरले आहे.