नवनिर्वाचित महापौरांचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेने कडून स्वागत ; युवक हक्क आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन..
नवनिर्वाचित महापौरांचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेने कडून स्वागत 

युवक हक्क आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन

पनवेल दि.१८ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील आणि महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांची  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेतली. यावेळी महापौरांचे स्वागत करून शहराच्या युवक हक्क आणि सुरक्षिततेच्या संदर्भात महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने शहरातील वाढती व्यसनाधीनता आणि प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न यावर सविस्तर चर्चा केली.
पनवेल शहरात सध्या वाढत्या व्यसनाधीनतेची समस्या गंभीर रूप धारण करत असून यामुळे अनेक तरुण कुटुंबे संकटात सापडत आहेत. यावर उपाय म्हणून शहरात तातडीने शासनमान्य, प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर आणि समुपदेशक असलेले शासकीय पुनर्वसन केंद्र स्थापन करावे, अशी मागणी युवासेनेने केली आहे. 

महापालिकेच्या सभेत यासंदर्भात ठराव मंजूर करून प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, असा आग्रह यावेळी पनवेल महानगर समन्वयक जय कुष्टे व विधानसभा चिटणीस सुशांत सावंत यांनी धरला. ​व्यसनमुक्तीसोबतच शिक्षणाच्या मुद्द्यावरही युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये जर अल्पसंख्याक कोट्यातील जागा रिक्त राहिल्या, तर त्या जागांवर स्थानिक प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळावे, यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय संविधानाच्या कलम ३०(१) अंतर्गत अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित ठेवून सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर हा निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली. तसेच, राईट टू एज्युकेशन (RTE) अंतर्गत पनवेलमध्ये केंद्रांची संख्या वाढवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना प्रभावी प्रवेश मिळावा, यासाठी ठोस पाठपुरावा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ​शहराच्या विकासासाठी ज्या कुटुंबांनी जमिनींचा त्याग केला, त्यांच्या मुलांना शिक्षणाची समान संधी मिळावी आणि पनवेल व्यसनमुक्त व सशक्त व्हावे, ही युवासेनेची ठाम भूमिका असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

या प्रसंगी विधानसभा अधिकारी अजय पाटील, विधानसभा चिटणीस सुशांत सावंत, विधानसभा समन्वयक अरविंद कडव, महानगर चिटणीस जीवन पाटील, खांदा कॉलनी शहर चिटणीस सुयश बंडगर, शाखा अधिकारी आदिल शेख यांसह अनेक युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.



फोटो :  नवनिर्वाचित महापौरांचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेने कडून स्वागत
Comments