लायन्स सरगम मोफत संगीतोपचार केंद्राचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले उदघाटन...
पनवेल वैभव / प्रतिनिधी : - सरगम लायन्स क्लब चा महत्त्वाकांक्षी उपक्रम "लायन्स सरगम म्युझिक थेरपी सेंटर" चे बुधवार दि. 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पनवेलचे आमदार मा. प्रशांत जी ठाकूर यांचे हस्ते मोठ्या उत्साहात उदघाटन संपन्न झाले.
याप्रसंगी प्रांतपाल एन आर परमेश्वरन, प्रथम प्रांतपाल संजीव सुर्यवंशी तसेच डिस्ट्रिक्ट मधील विविध पदाधिकारी उपस्थित होते. सरगम क्लबच्या अध्यक्ष डॉ मानदा पंडित यांचे संकल्पनेतून हा उपक्रम सुरु झाला आहे. सरगम क्लबच्या अध्यक्ष मानदा पंडित यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की “आजच्या तणावपूर्ण जगात, औषधे मदत करत असताना, पूर्णतः लवकर बरे होण्यासाठी आणि आंतरिक शांती आणण्यासाठी म्युझिक थेरपीसारखे पर्यायी उपचार आवश्यक आहेत.” मोफत म्युझिक थेरपी देऊन या उदात्त कार्याला हातभार लावल्याबद्दल प्रशांत ठाकूर यांनी लायन्स सरगम क्लबचे कौतुक केले.
प्रमुख अतिथी प्रांतपाल एन आर परमेश्वरन आणि प्रथम प्रांतपाल संजीव सुर्यवंशी यांनी सुद्धा फक्त 2 वर्षात क्लब ने केलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करुन पनवेल परिसरात लायन्सचे नाव उज्वल केल्याबद्दल सरगम क्लबचे अभिनंदन आणि कौतुक केले. या कार्यक्रमात उपस्थिताना आदित्य दोशी यांनी संगीतोपचार प्रात्यक्षिक दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोडसे यांनी केले तर आभार प्रेमेंद्र बहिरा यांनी मानले.
या संगीतोपचार केंद्रात दर गुरुवारी 6 ते 8 या वेळात दिव्यम ज्योती होलिस्टिक सेंटर, 502, श्री गणेश अपार्टमेंट, सुश्रुषा रुग्णालयासमोर पनवेल येथे मोफत संगीतोपचार देण्यात येणार आहेत त्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणी आणि अधिक माहितीसाठी मानदा पंडित 7700976352, आदित्य दोशी 9821681026, प्रेमेंद्र बहिरा 9820974715, संजय गोडसे 9869347300 यांच्याशी संपर्क करावा असे यावेळी संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
उदघाटन कार्यक्रमा साठी रिजन चेअरमन सुयोग पेंडसे,झोन चेअरमन अल्केश शहा, सचिव प्रेमेंद्र बहिरा, संजय गोडसे, डॉ आदित्य दोशी, संध्या महानुभाव, ओंकार खेडकर, अश्विनी खेडकर, सुषमा पन्हाळे, महेंद्र लोहार, प्रदीप भट्टाचार्य तसेच डिस्ट्रिक्ट मधील अनेक पदाधिकारी आणि पनवेल मधील नागरिक उपस्थित होते.