गर्भाशयाच्याबाहेर रोपण झालेल्या दुर्मिळ कॉर्नुअल एक्टोपिक प्रेग्नन्सीवर यशस्वी उपचार ...
खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमध्ये ३३ वर्षीय महिलेवर  लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करत टाळली जीवघेणी गुंतागुंत...

पनवेल वैभव / नवी मुंबई : दुर्मिळ अशा गर्भाशयाच्या वरच्या भागात गर्भरोपण (कॉर्नुअल एक्टोपिक प्रेग्नेन्सी) झालेल्या ३३ वर्षीय महिलेवर खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमध्ये
यशस्वी उपचार करण्यात आले. ही महिला सिझेरियन प्रसूतीनंतर अवघ्या सात महिन्यांतच पुन्हा गर्भवती झाली. या रुग्णाला गुंतागुंतीच्या गर्भधारणेचा इतिहास होता, ज्यामध्ये एक्टोपिक प्रेग्नन्सीचाही समावेश होता. योग्य तपासणी होईपर्यंत तिची दुर्मिळ अशी कॉर्नुअल एक्टोपिक प्रेग्नन्सी लक्षात आली नाही. प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ यांच्या नेतृत्वाखालील टिमने वेळीच निदान निदान आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केल्याने रुग्णावर यशस्वी उपचार करता आले. यामुळे रुग्णाचा जीव वाचविणे शक्य झाले व गंभीर गुंतागुंत टाळता आली.

नवी मुंबईत राहणाऱ्या  ३३ वर्षीय श्रीमती हर्षाली श्रीनिवास पलसोडकर यांना २०२० मध्ये एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली होती, ज्यात एक फॅलोपियन ट्यूब काढून टाकण्यात आली होती. त्यानंतर तिला पुन्हा भविष्यात गर्भधारणा झाली व ते गर्भरोपण गर्भाशयात झाले असून तिने सी-सेक्शनद्वारे बाळाला जन्म दिला. या बाळंतपणानंतर अवघ्या सात महिन्यांनी तिला कळाले की ती पुन्हा गर्भवती आहे आणि त्यांनी डॉ. सुरभी सिद्धार्थ यांना भेट दिली.

*खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलच्या प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ सांगतात की,* सात महिन्यांच्या प्रसूतीनंतर, रुग्णाला लक्षात आले की तिची मासिक पाळी आली नाही आणि गर्भधारणा चाचणीत ती गर्भवती असल्याचे निदान झाले. योनी आणि पोटाच्या सोनोग्राफी दरम्यान ही गर्भधारणा ओळखणे कठीण होते. अल्ट्रासाऊंडमध्ये देखील गर्भाशय किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये गर्भधारणा दिसून आली नाही, ज्यामुळे एक्टोपिक गर्भधारणा किंवा इतर गुंतागुंतीचा संशय आला. एक्टोपिक गर्भधारणेचे मूल्यांकन करण्यासाठी बीटा एचसीजी चाचणी करण्यात आली. एका आठवड्यानंतर वारंवार केलेल्या अल्ट्रासाऊंडमध्ये असे दिसून आले की गर्भधारणा गर्भाशयाच्या कॉर्नुअल भागात होती, जी गर्भधारणेसाठी एक अतिशय दुर्मिळ जागा आहे, विशेषतः त्याच बाजूला जिथे पूर्वी फॅलोपियन ट्यूब काढून टाकण्यात आली होती आणि कॉर्नुअल एक्टोपिक गर्भधारणेची निश्चिती झाली.

गर्भाशयाच्या वरच्या भागात, फॅलोपियन ट्यूबजवळ, गर्भाचे रोपण होते तेव्हा दुर्मिळ अशी कॉर्नुअल एक्टोपिक प्रेग्नेन्सी म्हणून ओळखली जाते. ही गर्भधारणा जरी गर्भाशयाच्या बाहेर दिसत असली तरी ती गर्भाशयाच्या भिंतीच्या आत होते, ज्यामुळे ती ओळखणे अतिशय आव्हानात्मक होते. सर्व एक्टोपिक गर्भधारणेपैकी अंदाजे २ ते ४% प्रकणांमध्ये अशाप्रकारची गर्भधारणा होतें याचा अर्थ असा की २५०० पैकी १ आणि एकूण ५००० गर्भधारणेपैकी १ महिलेस अशा प्रकारची गर्भधारणा होते ज्यामुळे ती एक्टोपिक गर्भधारणेचा एक दुर्मिळ प्रकार ठरते. 

कॉर्नुअल एक्टोपिक गर्भधारणा बहुतेकदा फायब्रॉइड्स किंवा पॉलीप्स समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या प्रकरणात, फलित अंडी गर्भाधानानंतर कॉर्नुअल एक्टोपिक क्षेत्राकडे स्थलांतरित झाली. अशा गर्भधारणेत जास्त धोका असतो कारण जर गर्भधारणा खूप मोठी झाली तर ८-१० आठवड्यांनंतर मोठ्या रक्तवाहिन्या फुटू शकतात, ज्यामुळे गंभीर व अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. रक्तवाहिन्या फुटल्याने होणारा रक्तस्त्राव हे मातामृत्यूचे कारण आहे. या रुग्णासाठी, गर्भधारणा वेळीच ओळखण्यासाठी आणि वेळेवर हस्तक्षेप करून कोणत्याही जीवघेण्या गुंतागुंती टाळण्यासाठी वारंवार फॉलो-अप चाचण्या, बीटा एचसीजी चाचण्या (रक्तातील मानवी कोरिओनिक गोनाडोट्रोपिन मोजण्यासाठी) आणि उच्च दर्जाची सोनोग्राफी करणे गरजेचे आहे असे माहिती डॉ. सुरभी सिद्धार्थ यांनी दिली.

गर्भधारणा काढून टाकण्यासाठी आणि ती रोखण्यासाठी रुग्णावर लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेने कॉर्नुअल एक्टोपिक क्षेत्रातील गर्भधारणा यशस्वीरित्या काढून टाकण्यात आली ज्यामुळे संभाव्य रक्तस्त्राव आणि गुंतागुंत टाळता आली. ही शस्त्रक्रिया एक सुमारे एक तास चालली आणि गर्भाशय वाचविण्यात डॅाक्टरांना यश आले. खारघर येथील मदरहुड हॉस्पिटलमधील डॉ. सुरभी सिद्धार्थ, डॉ. उज्ज्वल महाजन आणि डॉ. अनिता रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

डॉ. सुरभी सिद्धार्थ यांनी जागरूकता आणि नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत, विशेषतः गुंतागुंतीच्या गर्भधारणेचा इतिहास असलेल्या महिलांसाठी. तुम्ही स्तनपान करत असलात किंवा नियमित मासिक पाळी येत नसली तरीही, जर तुम्हाला गर्भवती असल्याची शंका असेल तर गर्भधारणा चाचणी करणे आवश्यक आहे. स्तनपानादरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे बऱ्याचदा गर्भधारणेची लक्षणे दिसून येत नाहीत, त्यामुळे कोणत्याही असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका आणि गरज पडल्यास वैद्यकीय मदत घ्या. कॉर्नुअल एक्टोपिक प्रेग्नन्सीसारखे संभाव्य धोके वेळीच ओळखण्यासाठी नियमित फॉलो-अप, बीटा एचसीजी पातळीचे निरीक्षण करणे आणि अल्ट्रासाऊंड तपासणी करणे गरजेचे आहे.

*श्रीमती हर्षाली श्रीनिवास पलसोडकर यांनी त्यांचा अनुभव सांगितला,* माझा गर्भधारणेचा प्रवास आव्हानात्मक राहिला आहे. २०२० मध्ये मला अनेकदा चक्कर येणे आणि तपासणी केल्यानंतर, नऊ आठवड्यात वाढलेल्या फॅलोपियन ट्यूबसह एक्टोपिक गर्भधारणेचे निदान झाले. पुढील महिन्यासाठी शस्त्रक्रिया नियोजित असली तरी, दुसऱ्या दिवशी माझी फॅलोपियन ट्यूब फुटली, ज्यामुळे त्वरित शस्त्रक्रिया करावी लागली आणि माझी डावी ट्यूब काढून टाकावी लागली. डिसेंबर २०२३ मध्ये मी अनपेक्षितपणे गर्भवती राहिली आणि ऑगस्ट २०२४ मध्ये माझ्या बाळाला जन्म दिला.

डिसेंबर २०२४ मध्ये, मी पुन्हा गर्भवती राहिली, परंतु एचसीजी पातळी सकारात्मक असूनही अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भधारणा कुठे विकसित झाली आहे हे शोधता आले नाही. डॉ. सुरभी यांचा सल्लामसलत घेत पुन्हा तपासणी करण्यात आली ज्यात एक दुर्मिळ कॉर्नुअल एक्टोपिक गर्भधारणेचे निदान झाले, ज्यासाठी त्वरित लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आवश्यक होती. मदरहूड हॉस्पिटलमधील डॅाक्टरांनी प्रसंगावधान राखत माझ्यावर उपचार केले त्यामुळे जीवघेणी गुंतागुंत टाळता आली. गर्भघारणेसंबंधी अगदी किरकोळ लक्षणांकडे देखील दुर्लक्ष करू नका असे मी प्रत्येक महिलेलाआवाहन करते. नियमित अल्ट्रासाऊंड, एचसीजी चाचण्या आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच निदान केल्यास एक्टोपिक गर्भधारणेसारख्या गुंतागुंत जीवघेण्या होण्यापूर्वीच त्यांचे निदान करण्यास मदत होते. 

हे प्रकरण कॉर्नुअल एक्टोपिक प्रेग्नन्सीसारख्या दुर्मिळ आणि उच्च-जोखीम असलेल्या गर्भधारणेचे व्यवस्थापन करण्यासाठी लवकर निदान, नियमित तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ल्याचे महत्त्व अधोरेखित करते.

चौकट

कॉर्नुअल एक्टोपिक प्रेग्नन्सी ही एक्टोपिक प्रेग्नन्सीचा एक असामान्य आणि धोकादायक असा प्रकार आहे जो गर्भाशयाच्या कॉर्नुआमध्ये विकसित होतो. कॉर्नुआ हा गर्भाशयाचा सर्वात वरचा कोपरा आहे, जिथे फॅलोपियन नलिका गर्भाशयाच्या पोकळीला जोडल्या जातात.
Comments