कोल्हापूरचा पृथ्वीराज डांगे व नागपूरची संजना जोशी ठरले वेगवान जलतरणपटू...

मालवणात राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न

मालवण / (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणच्या चिवला बीचवर आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ५ किमी व ३ किमी अंतराच्या विविध गटातील जलतरण स्पर्धा संपन्न झाल्या. या सर्वांमधून ५ किमी अंतराच्या प्रमुख स्पर्धेत मुलांमधून वेगवान जलतरणपटूचा मान कोल्हापूरच्या पृथ्वीराज डांगे याने मिळविला. तर मुलींमधून नागपूरच्या संजना जोशी हिने वेगवान जलतरणपटूचा मान मिळविला. तर तीन किमी अंतराच्या स्पर्धेतून वेदांत गडाख व आरोही पालकडे यांनी वेगवान जलतरणपटूचा मान मिळविला. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत नागपूर, कोल्हापूर, ठाणे, बेळगाव, रायगड येथील स्पर्धकांचे वर्चस्व दिसून आले.

मालवण चिवला बीच येथे काल व आज असे दोन दिवस सागरी जलतरण स्पर्धा रंगली. पहिल्या दिवशी ५०० मीटर, १ कि.मी., २ कि.मी. अंतराच्या मुलगे- मुली, ज्येष्ठ पुरुष व महिला, दिव्यांग पुरुष व महिलांच्या स्पर्धा झाल्या. यातून पाखी हलगेकर (बेळगाव), प्रिन्स काठवले (ठाणे), वेदांत मिसळे (बेळगाव), रेवा परब (ठाणे), आयुषी आखाडे (ठाणे), अनिष पई (बेळगाव) यांनी विजेतेपद मिळवीत 'वेगवान जलतरणपटू' चा मान मिळविला होता. तर आज ३ किमी व ५ किमी अंतराच्या विविध गटातील स्पर्धा झाल्या. 

विविध गटात विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर वेगवान जलतरणपटूंना भव्य चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या तांत्रिक टीम, स्वयंसेवक, स्थानिक पर्यटन व बोट व्यावसायिक, ध्वनी व्यवस्था, जीव रक्षक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक परब, राज्य संघटना सचिव राजेंद्र पालकर, ऍड. नाखवा, राज्य उपाध्यक्ष राजेश मोरे, घनश्याम कुवर, माजी सचिव किशोर वैद्य, खजिनदार अरुण जगताप ,आनंद माने, निल लब्दे, डॉ. राहुल पंतवालावलकर, नगरपालिकेचे अभियंता सुधाकर पाटकर, भास्कर कुलकर्णी, सौ. बेडगे, राजा केरीपाळे आदी व इतर उपस्थित होते. 

दुसऱ्या दिवशी झालेल्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- गट तिसरा ३ कि.मी. मुली- १. आरोही पालकडे (रत्नागिरी), २. अनन्या पई (बेळगाव), ३. आदीत्री पायसी (नागपूर). मुलगे- १. वेदांत गडाख (नाशिक), २. इशांत चावरे (नागपूर), ३.पुष्कर गवळी (कोल्हापूर). 

गट चौथा - ५ कि.मी. मुलगे - १. स्मरण मंगलोरकर (बेळगाव), २. अनुज उगले (नाशिक), ३.विनायक कुवर (नाशिक). मुली- १. संजना जोशी (नागपूर), २. श्रावणी वालावलकर (रत्नागिरी), ३. सानिका कावडे (नागपूर). 

गट पाचवा- ५ कि.मी. मुलगे- १.पृथ्वीराज डांगे (कोल्हापूर), २. शुभम होले (ठाणे), ३. आदित्य गडकरी (बेळगाव). मुली- १. अनुजा उगले (नाशिक), २. स्नेहल जोशी (नागपूर), ३. तनया पाटील (नाशिक).

गट सहावा - ३ कि.मी. मुलगे- १. अमर पाटील (रायगड), २. ओंकार कोळी (रायगड), ३. प्रीतम पाटील (सांगली). मुली - १. सोनाली मोरे (पुणे), २. भाग्यश्री तांबोळी (मुंबई), ३. शीतल सावंत (मुंबई).

गट सातवा- ३ कि.मी. मुलगे- १. संदीप भोईर, २. गिरीश मुलूक (पुणे), ३. किरण पोवेकर (सातारा). मुली- नुशिन नलवाला (पुणे), २. गीतांजली चौधरी (ठाणे), ३. उत्तरा पेठे (नाशिक). 

गट आठवा- ३ कि.मी. पुरुष- १. संजय जाधव, २. विनय शाह (मुंबई), ३. प्रकाश वराडकर (सिंधुदुर्ग). महिला- १. मनीषा द्विवेदी (मुंबई), २. रूपा कपाडिया (बेळगाव), ३. प्रीती चव्हाण (मुंबई), ४. सारिका मोहिरे (बेळगाव).
Comments