पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पदयात्रा

 पनवेल / प्रतिनिधी : -  देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण सर्वांनी साजरा केला गेला पाहिजे. प्रत्येक देशवासीयाच्या मनात देशाबद्दल आदर, गौरव आणि गर्व असलाच पाहिजे. यासाठीच या पदयात्रेचे आयोजन केले आहे. मोदी सरकारने हर घर तिरंगा या अभियानांतर्गत घरोघरी तिरंगा लावावा असा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांच्या घराघरात तिरंगा आहे, प्रत्येकाच्या मनामनात तिरंगा आहे. परंतु दैनंदिन जीवनात नागरिकांना अनेक महत्त्वाचे प्रश्न भेडसावत आहेत. सर्वात मोठे संकट म्हणजे आता महागाई कमी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केले. ते आज पनवेल येथे काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या पदयात्रेप्रसंगी बोलत होते.
           ते पुढे म्हणाले की, आज नागरिकांना विविध प्रश्न भेडसावत असताना महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर आहे. जिडीपीच्या दराकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे कार्यक्रम राबवून महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. या पदयात्रेबरोबर काँग्रेसजनांनी असा अजेंडा घेतला आहे की, हे सरकार बदलण्याची गरज आहे. महागाई, बेरोजगारी अशा विविध समस्या दुर करायच्या आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि पनवेल मधील सातही ब्लॉक मिळून सदर पदयात्रा, बाईक रॅली आणि कार रॅली काढण्यात आली होती.
           स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पनवेलमध्ये पनवेल शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (रविवार दि.१४ ऑगस्ट) पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आझादी गौरव पदयात्रा, बाईक व कार रॅली आयोजित करण्यात आली होती. सकाळी ९ वाजता पनवेल काँग्रेस पक्ष कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली असून पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, नावडे तळोजे मार्गे जाऊन खारघर येथे रॅलीचे समारोप करण्यात आला. 
             पदयात्रेत रायगड जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी तथा माजी आमदार हुस्नबानू खलिफे, जेष्ठ काँग्रेस नेते डॉ.भक्तीकुमार दवे, जेष्ठ नेते जी आर पाटील, अनंत पाटील, ऍड.मदन गोवारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, जिल्हा सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, महाराष्ट्र अल्पसंख्याक विभाग सरचिटणीस अमीर सय्यद, पनवेल जिल्हा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष नौफिल सय्यद, पनवेल जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षा माया आहिरे,    अर्बन बँक संचालक जनार्दन पाटील , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव विश्वजीत पाटील ,जिल्हा सेवा दल अध्यक्ष राजीव चौधरी, पनवेल शहर काँग्रेस अध्यक्ष लतीफ शेख, नवीन पनवेल शहर अध्यक्ष राहुल जानोरकर ,महिला अध्यक्षा पूजा मोहन ,अल्पसंख्यांक अध्यक्ष समीर पठाण ,खांदा कॉलनी शहर अध्यक्ष जयवंत देशमुख ,कार्याध्यक्ष सागर पगारे, कामोठे शहर उपाध्यक्ष जे एस लोखंडे, कलंबोली युवा नेते मन पाटील, तलोजा युवक अध्यक्ष फेज दोन मोरेश्वर पाटील, तलोजा फेज वन अध्यक्ष विजय केणी , सरचिटणीस जिल्हा बबन केणी, युवक अध्यक्ष तेजस केनी, खारघर शहर काँग्रेस अध्यक्ष विश्वनाथ चौधरी, युवक उपाध्यक्ष जिल्हा अभिजीत मंडक्कल, कार्याध्यक्ष मुदसिफ मोडक ,महिला अध्यक्ष सोनिया सहोटा, जिल्हा उपाध्यक्ष रेमंड गोवनिस, पनवेल शहर जिल्हा व सर्व ब्लॉकचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चौकट:
'घरोघरी तिरंगा' ही मोहीम राबविण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या भूलथापा मारल्या आहेत त्यामधे ते म्हणाले होते की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाआधी भारतातील प्रत्येक बेघर नागरिकाला स्वतःचे घर देईन, असे खोटे आश्वासन त्यांनी दिले होते. आणि आज प्रत्यक्षात भारतातील लाखो नगरीत बेघर आहेत. केंद्र शासनाकडून अनेक योजना आणल्या जातात, पण त्या व्यवस्थितरीत्या राबवल्या जात नाहीत. आणि जरी राबवल्या गेल्या तरी त्याचा लाभ सर्वानाच होत नाही ही आजची शोकांतिका आहे, असेही पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले.
Comments