पोलीस पाटील यांनी आपले कर्तव्य बजावताना सतर्क राहणे गरजेचे - परिमंडळ २ पोलीस उपायुक्त शिवराज पाटील..
पोलीस पाटील यांनी आपले कर्तव्य बजावताना सतर्क राहणे गरजेचे - परिमंडळ २ पोलीस उपायुक्त शिवराज पाटील.

पनवेल वैभव :-  दि,१०(संजय कदम): पोलीस पाटील हे खऱ्या अर्थाने त्या गावाचे पोलिसच असतात त्यामुळे त्यांनी आपले कर्तव्य बजावताना सतर्क राहणे गरजेचे आहे. गावात काय चाललंय याची माहिती वेळोवेळी घेऊन काही गोष्टी समाज विघातक असल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलिसांना द्यावी असे आवाहन परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी आज पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंथन सभागृह येथे घेतलेल्या पोलीस पाटलांच्या बैठकीत केले.
           या बैठकीला परिमंडळ २ पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर, पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ, गोपनीय विभागाचे सचिन होळकर यांच्यासह तालुका हद्दीतील ३२ पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले की, पोलीस पाटलांनी सामाजिक भान ठेऊन काम करावे, कोणत्याही अवैध्य गोष्टी होत असल्यास त्याची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी त्यामध्ये प्रामुख्याने शाळा, कॉलेज परिसरातील बेकायदेशीर गुटखा विक्री, मद्य विक्री, अंमली पदार्थांची विक्री, त्यामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. तरी अश्या प्रकारच्या कृत्यांना वाव देऊ नये. गावात वातावरण बिघडवणाऱ्या घटना घडत असतील तर त्याची माहिती त्वरित द्यावी अनेक वेळा बेकायदेशीर बॅनर लावून त्यातून वाद निर्माण होतात. तरी संबंधित बॅनर लावण्यापूर्वी त्या बाबतच्या आवश्यकत्या परवानग्या घेतल्या आहेत का, याची माहिती घ्यावी. सामाजिक तेढ निर्माण करणारे बॅनर लावेल असतील तर त्याची माहितीत त्वरित द्यावी. गाव परिसरात असलेल्या हॉटेल, बार, लॉजिंग मध्ये अनेक वेळा बांग्लादेशीय महिला कामास असतात याची माहिती मिळाल्यास त्यासंदर्भात माहिती द्यावी तसेच वेअरहाऊस मध्ये चोरीचे रॅकेट कार्यरत असते त्याच प्रमाणे बेकायदेशीर ऑइल विक्री, जुगार, हे प्रकार सुरु असतात यातून वाद होतात व या संदर्भात पोलिसांना माहिती द्यावी. त्याच प्रमाणे कित्येक जण कुठलीही परवानगी नसताना पुतळे किंवा धार्मिक स्थळे उभारतात त्या संदर्भात सुद्धा माहिती द्यावी. गावातील चोहोबाजूला सीसीटीव्ही लावण्या संदर्भात आवश्यक त्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. ज्या ग्रामपंचायतींची परिस्थिती सीसीटीव्ही उभारण्याची नसेल त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा त्यांना खाजगी संस्थेच्या माध्यमातून मदत करून देण्यात येईल. पोलीस पाटलांचे काम चांगले सुरु असून ते पोलिसांच्या कामाचा भार हलका करीत आहेत.त्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा त्यांनी या वेळी केले तर वरिष्ठ पोलीस निरीक्ष रवींद्र दौडकर यांनी सांगतिले की, गाव पातळीवर मुके जनावरे चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहेत. तरी या बाबत सर्वानी सतर्कता बाळगावी व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही या कडे लक्ष द्यावे असे आवाहन  त्यांनी केले.



फोटो: पोलीस उपायुक्त शिवराज पाटील पोलीस पाटीलांना मार्गदर्शन करतात सोबत सहायक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर, पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ, गोपनीय विभागाचे सचिन होळकर आदी.
Comments