पनवेल तालुका पत्रकार महासंघ व मोरे हेल्थकेअर आयोजित आरोग्य शिबिर संपन्न...
पनवेल /(प्रतिनिधी): पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य शिबीर एस.पी.मोरे कॉलेज नवीन पनवेल येथे आज शनिवार दि.११ रोजी पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व डॉक्टरांच्या बहुमूल्य मार्गदर्शनरुपी सहकार्याने संपन्न झाला.
लोकशाहीची सामाजिक बांधिलकी जपत असताना पत्रकारांचा आहार व आरोग्य सुस्थितीत कसे रहावे त्याचबरोबर पत्रकारांनी कोणती काळजी घ्यावी, या उद्देशाने पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांच्या संकल्पनेतून मोरे हेल्थकेअर आणि पनवेल तालुका पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी उपस्थित पत्रकारांचे पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी स्वागत केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे उपाध्यक्ष दीपक घोसाळकर यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पनवेल तालुका पत्रकार महासंघाने आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत, यामध्ये वृक्षारोपण, कुष्टरोगी बांधवांना खाऊचे वाटप, वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप, आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटप, जागतिक महिला दिनी कर्तुत्ववान महिलांचा यथोचित सन्मान यासारखे अनेक उपक्रम महासंघाच्या माध्यमातून राबविले आहेत.
आजच्या आरोग्य शिबिरात पत्रकारांच्या अत्यावश्यक शारीरिक तपासण्या करण्यात आल्या, यामध्ये रक्तदाब, सोप्या पद्धतीची रक्त तपासणी, ऑक्सीजन पातळी तपासणी, एकूण शारीरिक वजन आणि शारीरिक संतुलन वैद्यकीय सल्ला, शरीरातील वेगवेगळ्या रक्त घटकांची तपासणी या व इतर तपासण्या करण्यात आल्या, तसेच निरोगी आरोग्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपस्थित पत्रकारांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे जेष्ठ सल्लागार तथा दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर, रायगड शिव सम्राटचे संपादक तथा पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, उपाध्यक्ष तथा दैनिक पुढारीचे प्रतिनिधी दीपक घोसाळकर, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी तथा सचिव मयूर तांबडे, खजिनदार तथा आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील, वतन कर्नाळाचे संपादक भालचंद्र जुमलेदार, रसायनी टाइम्सचे संपादक अनिल भोळे, पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरघोडे, दैनिक किल्ले रायगडचे प्रतिनिधी प्रदिप वालेकर, रायगड शिव सम्राटचे प्रतिनिधी सुभाष वाघपंजे, वतन कर्नाळाचे प्रतिनिधी शेखर भोपी त्याचबरोबर मोरे हेल्थ केअरचे क्लिनिक मॅनेजर आर्यन शेळके, डॉ. प्रिया भट्टाचार्य, डॉ. सिद्धी देवळेकर, प्रशासकीय अधिकारी अनिल मखामले, नर्सिंग कर्मचारी सुजाता आठवाल, संघमित्रा हिवाळे, सुचिता सुतार, कार्यालयीन प्रतिनिधी जान्हवी लोखंडे, बाळाराम पारधी यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी पनवेल जेष्ठ पत्रकार घनश्याम मानकामे, विक्रम बाबर, मनोहर सचदेव, राजू गाडे, अविनाश जगधने, अनिल राय, प्रथमेश रेवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.