देहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी वाचवला जीव....
देहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी वाचवला जीव....
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः पनवेलजवळील देहरंग येथील नदीवर एक मुलगी कपडे धुण्यासाठी आली होती, तिच्यासोबत तीचा छोटा भाऊ सुद्धा होता. माञ, कपडे धुत असतांना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. ते त्या मुलीचे लक्षात न आल्याने पाण्याच्या प्रवाहाने त्या मुलीला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडल्याने ती मुलगी प्रवाहाबरोबर वाहून गेली. पुढे ती मुलगी नदीत असणा-या झुडपात अडकली होती.
 परंतु, त्या मुलीला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी कोणाला जाणे शक्य नव्हते. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांपैकी स्वतःचा जीव धोक्यात घालून रघुनाथ कान्हा चौधरी, चंदर बाळाराम वाघ या स्थानिक ग्रामस्थांनी तेथे कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांकडील चार - पाच साड्या एकत्र करून त्याला गाठ बांधून त्या साड्या त्यामुलीकडे फेकल्या व तिला घट्ट धरुन ठेवण्यास सांगितले. यावेळी मालडुंगे येथील वनरक्षक बी.एम.हटकर हे उपस्थित होते. त्यांनी सुद्धा जिवाची बाजी लावून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या मुलीला सुखरुपपणे काठावर आणले. यावेळी ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.

Comments