पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः कोरोना महामारीनंतर पेन किलर गोळ्यांचा वापर वाढला असून ते आरोग्यासाठी धोकादायक आहे. अनेक आजारांमध्ये अंग मोडून येऊ शकते. आपल्या शरीराला काही त्रास झाला तर पेन किलर गोळी घेण्याचे आपल्यावर जणू संस्कारच झाले आहे. परंतु पेनकिलर गोळ्यांचे अतिसेवन हे आरोग्यासाठी त्रासदायक आहे.
अमेरिकन क्रोनिक पेन असोसिएशनद्वारा संपूर्ण जगभर सप्टेंबर हा महिना हा वेदना जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व ज्येष्ठ फिजिशियनव व छातिरोग तज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ म्हणाले, अंग दुखणं म्हणजेच आपल्या शरीराला सतत त्रास होत राहणे होय. छातीत दुखणे, गुडघे व सांधे दुखणे, तसेच जे नागरिक उदरनिर्वाहासाठी अंगमेहनतीची कामे करतात ते अंगदुखीनी बेजार असतात. आजमितीला वयाच्या तिशीतल्यातरुण पिढीला सुद्धा शारीरीक दुखणी सुरू झाले आहेत. आपल्याकडे अंगदुखी व पेनकिलर ही नवरा बायकोची जोडी झाली आहे. अनेक नागरिक वर्षानुवर्षे अंगदुखीसाठी पेन किलरचा वापर करीत असतात. प्रामुख्याने संसर्गजन्य ताप, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, अशा आजारांमध्ये तापासोबत अंग दुखते. काहीवेळा शरीरातील डी जीवनसत्व कमी असल्याने सांधेदुखी होते. दात दुखणे, हातापायात वेदना होणे, डोकेदुखी अशा सर्वसाधारण आजारांमध्ये अनेकजण मेडिकल दुकानात जाऊन पेन किलर घेतात त्यामुळे त्यांना तात्पुरता आराम मिळतो. परंतु त्या आजाराची कारणे शोधली पाहिजेत. करोनाच्या पहिल्या लाटेत जी औषधे वापरली गेली त्या औषधांचा वापर दुसर्या लाटेत कमी झाला पंरतु आजही अनेक पहिल्या लाटेचीच प्रिस्क्रिप्शन वापरले जाते. आजकाल सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रिस्क्रिप्शन शेयर केली जातात व ते धोकादायक आहे. अनेकवेळा हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक या आजाराची सौम्य लक्षणे दिसल्यावर अनेकजण पेनकिलर म्हणजे वेदनाशामक गोळ्यांच्या मारा करतात. त्यामुळे पुढील काही दिवस ती लक्षणे दिसत नाहीत व रुग्णाला खात्री वाटते की आपला आजार बरा झाला आहे परंतु तोच आजार थोड्याच दिवसांनी परत उफाळून येतो व त्यावेळी त्याचे निदान करणे कठीण जाते. पेनकिलरच्या अतीसेवनामुळे किडनी व हृदयाला सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो.