करोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या अपत्यांसाठी मुक्त विद्यापीठातर्फे शिक्षणक्रम शुल्क माफ - डॉ. ई. वायुनंदन

विद्यार्थ्यांना विविध शिक्षणक्रमांचे पर्याय खुले,
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश सुरु...

पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय साकारण्यासाठी जीवनात उपयुक्त ठरणार्‍या कौशल्याधिष्ठित शिक्षणाची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईनप्रवेशाच्या अत्याधुनिक व विद्यार्थीकेंद्रीतअशा सोप्या सुटसुटीत प्रवेश प्रक्रियेला महाराष्ट्रभरातून कोरोनाच्या संकटानंतरही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या जागतिक साथीच्या पार्श्‍वभूमीवर तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची मागणी असल्याने कृषी व बी. एड. शिक्षणक्रम वगळून इतर शिक्षणक्रमांच्या प्रवेशांची अंतिम मुदत 30 सप्टेंबर2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश नोंदवावेत, असे आवाहन मा. कुलसचिव- डॉ. दिनेश भोंडे, संचालक विद्यार्थी सेवा विभाग- डॉ. प्रकाश देशमुख व मुंबई विभागाचे शैक्षणिक सल्लागार- डॉ. वामन नाखले यांनी केले आहे. 

शैक्षणिक वर्ष 2021 -22 च्या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन बैठक रायगड जिल्ह्यातील यशवंत मेमोरियल ट्रस्ट, पनवेल  येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी रायगड जिल्ह्यातील अभ्यासकेंद्र प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना डॉ. वामन नाखले म्हणाले, मुक्त विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे प्रवेश एक जुलैपासून सुरू आहेत. एम.बी.ए. प्रवेशपरीक्षेचीप्रक्रीया सुरू झाली आहे. त्यात नोंदणी प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच सराव  प्रवेशपरीक्षाआणि त्यानंतर मुख्य प्रवेश परीक्षा देता येते. विद्यापीठातर्फे सुरूअसलेल्या शिक्षणक्रमांमध्ये 41 प्रमाणपत्र, 37 पदविका,  16 पदवी  आणि 14 पदव्युत्तर पदवी स्तरावरील  शिक्षणक्रमांचा समावेश आहे.  
 एम. ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, लोकप्रशासन, अर्थशास्त्र) एम. लिब.,एम. एस्सी. (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र), एम. कॉम, एम.बी.ए., एम. ए.(शिक्षणशास्त्र), एम.सी.ए. या पदव्युत्तर पदवींचा समावेश आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्र, जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या यासारख्या व्यावसायिक शिक्षणक्रमाबरोबरच मराठी व उर्दू माध्यमातील कला शाखेतील पदवी, बी. कॉम.(मराठी व इंग्रजी माध्यम), बी. कॉम (सहकार व्यवस्थापन). बी.बी.ए., बी.एस्सी.(गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र), बी.बी.ए.(बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट), बी.एस्सी.(कंप्युटर सिस्टिम डमिनिस्ट्रेशन) या पदवी शिक्षणक्रमांबरोबरच शालेय व्यवस्थापन, लॅब टेक्निशियन, योगशिक्षक, इंटीरियर डिझाईन अँड डेकोरेशन, इलेकट्रिशियन अँड डोमेस्टिक प्ली.मेटेनन्स, सिव्हील सुपरवायझर, निमेशन, कृषी अधिष्ठान,संमंत्रक प्रशिक्षण यासारख्या अनेक पदविका शिक्षणक्रमांचे ऑनलाईन प्रवेश सुरु आहेत. 

या शिवाय विद्यापीठाचे जर्मन, फ्रेंच, अरेबिक या भाषांमधील प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसह  20 पेक्षा जास्त  प्रमाणपत्र अभ्यासक्रम लोकप्रिय ठरत आहेत. 30 सप्टेंबर पूर्वी या शिक्षणक्रमांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन कुलसचिव- डॉ. दिनेश भोंडे,संचालक विद्यार्थी सेवा विभाग- डॉ. प्रकाश देशमुख व शैक्षणिक सल्लागार- डॉ. वामन नाखले यांनी केले आहे. डॉ. वामन नाखले म्हणाले, या शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखेतील पदविका आणि पदव्युत्तर पदवीचे  शिक्षणक्रम तसेच, उर्दू माध्यमातील पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम यूजीसीच्या मान्यतेने सुरु केले जात आहेत. तसेच, प्रशासकीय सेवांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन लोक प्रशासनाचा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमही सुरू केला आहे. सहयोग आणि विशेष उपक्रम केंद्राद्वारे अनेक रोजगाराभिमुख प्रमाणपत्र आणि पदविका शिक्षणक्रमांचे आयोजनही विद्यापीठाने सुरू केले आहे. त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे ज्यांच्या पालकांचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्याना मा. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी प्रवेशशुल्क माफ केले आहे.  अशा विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ. नाखले यांनी यावेळी केले. राज्यातील बंदिजनांसाठी विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी शिक्षणक्रम पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि त्याचा लाभही राज्यभरातील 11 कारागृहांतील बंदीजन घेत आहेत. मुंबईमधील 4 कारागृहांमधील बंदीजन विद्यापीठाचे विद्यार्थी असून त्यांतील काही पदवीधर होऊन कारावास संपल्यावर सामान्य जीवन जगत आहेत. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक सेवा, सुविधा पुरविण्यावर भर देणार. प्रवेशापासून परीक्षेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्दतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना  त्यांच्या सोयीने  शिक्षणक्रम पूर्ण करता येतात. विद्यापीठाचे अध्ययन साहित्य ई-बुक्स स्वरूपात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यावेळी विद्यापीठाच्या मुंबई विभागीय केंद्राचे सहायक कुलसचिव तुळशीराम सोनावणे,  प्रशासकीय संयोजिका जान्हवी करमासे आणि वरिष्ठ सहायक श्रीमती रागिणी पाटील आणि रायगड जिल्ह्यातील अभ्यासकेंद्रांचे केंद्रप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळशीराम सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन जान्हवी करमासे यांनी केले. या प्रसंगी यशवंत मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजेश मुळे आणि प्राचार्य प्रा. मनोज मुळे यांचे मार्गदर्शनही याप्रसंगी उपस्थितांना लाभले. पनवेलमधील अग्रगण्य असलेल्या बापूसाहेब डी.डी. विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांचा यावेळी विभागीय केंद्रातर्फे शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला होता. ऑनलाईन लेक्चर्सच्या प्रकल्पामध्ये अतुलनीय सहकार्य आणि मार्गदर्शन डॉ. सीमा कांबळे यांनी केले त्याप्रित्यर्थ त्यांचा सत्कार करण्यात आला.

Comments