महापालिकेकडून अंथरूणाला खिळलेल्या २७ नागरिकांचे लसीकरण..



पनवेल,दि.18 : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अंथरूणाला खिळून असणाऱ्या नागरिकांच्या कोविड लसीकरणास काही दिवसांपासून सुरूवात करण्यात आली आहे. आजवर पालिका क्षेत्रातील २७  नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आले. अशा रूग्णांच्या लसीकरणासाठी संबधितांनी नजिकच्या महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी समन्वय साधावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

अनेक कुटूंबामध्ये काही कारणाने अंथरूणावरती झोपून असलेले रूग्ण किंवा वयोवृध्द असतात जे लसीकरण केंद्रावरती जाऊन लस घेऊ शकत नाहीत. अशा नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या रूग्णांना, वयोवृध्द नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिलेल्या निर्देशानूसार बेडरिडन रूग्ण, वयोवृध्द नागरिकांना लसीकरण करण्यासाठी संबधितांनी जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी समन्वय साधून नोंदणी करावी. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विशेष पथकाच्या माध्यमातून बेडरिडन रूग्णांच्या घरी जाऊन त्यांचे लसीकरण केले जात आहे. 

कोविड लसीकरणामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्न करत आहे. लसींच्या उपलब्धतेनूसार बेडरिडन रूग्णांच्या संबधितांशी संपर्क साधून नागरी ओरोग्य केंद्रातील विशेष लसीकरण पथक लसीकरणाचे नियोजन करीत आहेत. नागरिकांनी आपल्या कुटूंबातील बेडरिडन रूग्ण किंवा वयोवृध्दांची नोंदणी नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करावी.
Comments