पनवेल दि.०९ (वार्ताहर)- लोकल मधील प्रवाशाचे पाकिट जबरदस्तीने लुटून पळून गेलेल्या दोघा लुटारुंना वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. विशाल शंकर शिंदे (25) व शाहरुख सोहेल अन्सारी (26) असे या लुटारुंची नावे असून त्यांनी प्रवाशाकडून लुटलेले पाकिट त्यांच्याकडून हस्तगत केले आहे.
या घटनेतील तक्रारदार सुरज देसाई हे हार्बर रेल्वे मार्गावरुन कुर्ला ते पनवेल असा प्रवास करत होते. सदर लोकल गोवंडी रेल्वे स्थानकातून मानखुर्दच्या दिशेने जाण्यासाठी निघाली असताना, दोघा लुटारुंनी सुरज देसाई यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढुन घेऊन गोवंडी रेल्वे स्थानकात उतरुन पलायन केले होते. याबाबत वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात दोघा लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी गोवंडी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज वरुन आरोपींचे वर्णन मिळविले. त्यानंतर पोलिसांनी गुफ्त बातमीदारामार्फत आरोपींची माहिती काढली असता, सदर आरोपी हे गोवंडी येथील बैंगणवाडी भागात रहाण्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.सी.आढाव व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने बैंगणवाडी भागात सापळा लावून विशाल शिंदे व शाहरुख अन्सारी या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर त्यानां अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु केसरकर यांनी दिली. या दोघांनी अशाच प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता असल्याने त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
फोटोः रेल्वे पोलिसांनी पकडलेले आरोपी